सर्व शिक्षणसंस्थांना गुणवत्तेसाठी ठरवून देण्यात आलेले कोणतेही निकष आपल्यासाठी लागूच होत नाहीत, अशा गृहीतकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ‘तंत्रज्ञान विभाग’! या विभागासाठी आवश्यक असलेल्या एकूण शिक्षकसंख्येपैकी फक्त एक चतुर्थाश शिक्षक हा विभाग चालवत आहेत. विद्येचे माहेरघर असा लौकिक असलेल्या विद्यापीठातील विविध विभागांचा प्रवास मात्र ‘त्रुटींचे माहेरघर’ वाटावा असा सुरू झाल्याचे दिसत आहे.
एखाद्या महाविद्यालयांत पायाभूत सुविधांमध्ये त्रुटी असतील, शिक्षकांची संख्या पुरेशी नसेल तर विद्यापीठ या महाविद्यालयांवर कारवाई करते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, विद्यापीठ अनुदान आयोग यांसारख्या संस्थांनी ठरवून दिलेल्या नियमांचा भंग केला तरीही महाविद्यालयांवर कारवाई होते. विद्यापीठाच्या विभागांमध्ये मात्र चालणाऱ्या मनमानीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठाने २०१० मध्ये तंत्रज्ञान विभागाला मान्यता दिली. या विभागाच्या माध्यमातून चार विषयांमधील एम.टेक म्हणजे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. एम.टेक हा तंत्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ठरवून दिलेले निकष लागू होतात. मात्र परिषदेच्या निकषांची सर्रास पायमल्ली या विभागात सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. विभागाकडून ‘इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स’, ‘मेकॅनिकल अँड मटेरिअल’, ‘केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी’, ‘कॉम्प्युटर अँड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी’ या विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ही २० आहे. त्यानुसार या विभागात साधारण १६ पूर्णवेळ मान्यताप्राप्त शिक्षक असणे अपेक्षित आहे. मात्र विभागात अवघे ४ पूर्णवेळ शिक्षक कार्यरत आहेत. ते देखील विद्यापीठाच्या इतरही विभागांमध्ये अध्यापन करतात. याशिवाय परिषदेने ठरवून दिलेले पायाभूत सुविधांचे निकषही या विभागाकडून पाळण्यात येत नाहीत. परिषदेकडून तंत्रशिक्षण महाविद्यालयांची पाहणी केली जाते. मात्र विद्यापीठाच्या विभागांची पाहणी केली जात नाही. त्यामुळे या विभागांचा कारभारही समोर येत नाही.

परिषदेचे नियम लागू होतात का?
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या प्रत्येक संस्थेला परिषदेचे नियम लागू होतात. विद्यापीठांना प्रत्येक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परिषदेकडून मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. मात्र, परिषदेने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच अभ्यासक्रम चालवणे बंधनकारक असते.

वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमही नावापुरताच
या विभागाकडून चालवण्यात येणारा वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमही आता नावापुरताच उरल्याचे दिसत आहे. अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या अवाढव्य शुल्कामुळे आणि परवाना मिळण्याची हमी नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठच फिरवल्याचे दिसत आहे. चालू शैक्षणिक वर्षांत या अभ्यासक्रमासाठी अवघ्या एका विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला आहे.