महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या प्रभाग ४० (अ) मधील पोटनिवडणुकीत रविवारी ४२.८२ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया निरुत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडली. मतमोजणी सोमवारी (८ जुलै) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.
प्रभाग ४० (अ) मधील या पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. मात्र, प्रथमपासूनच मतदारांचा सर्वच केंद्रांवर निरुत्साह होता. दुपापर्यंत जेमतेम वीस टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर कार्यकर्त्यांनी विविध वस्त्यांमध्ये फिरून मतदान वाढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तरीही टक्केवारी फारशी वाढली नाही. सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदान झाले होते. अगदी शेवटच्या अध्र्या तासात ही टक्केवारी थोडी वाढली आणि ती ४२.८२ टक्क्य़ांवर गेली. एकूणच मतदारांमध्ये उत्साह नव्हता. विविध राजकीय पक्षांचे शहरातील कार्यकर्ते निवडणुकीसाठी या प्रभागात आले होते. त्यामुळे सर्वत्र राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवक दिसत होते.
निवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके, मनसेच्या इंदुमती फुलावरे, राष्ट्रवादीच्या नीलम लालबिगे, भाजप-शिवसेना-आरपीआय युतीच्या संध्या बरके यांच्यात लढत होत असून मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता कोरेगाव पार्क येथे होणार आहे. या प्रभागात २२ हजार ८६३ मतदार आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची झाली असून काँग्रेस विरोधी पक्षनेता हे पक्षाकडे असलेले पद टिकवण्यासाठी, तर मनसे गेलेले विरोधी पक्षनेता हे पद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.