ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी अन्य न्यायालयात घेण्यात यावी, अशी मागणी करणारा विनंती अर्ज विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. फसवणूक प्रकरणात सुनावणी घेण्याचे आदेश फक्त विशेष न्यायालयाला आहेत, असे आदेशात म्हटले आहेत.
गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी याबाबत विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला होता. डीएसके प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश राजे यांच्या न्यायालयात सध्या सुरू आहे. या न्यायालयास सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. सहा महिन्यांत निकाल द्यावा, असा विनंती अर्ज अॅड. बिडकर यांनी विशेष न्यायालयात सादर केला
होता. राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार हे प्रकरण चालवले जात आहे. या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दैनंदिन सुनावणी ठेवणे अवघड आहे. करोनाच्या संसर्गामुळे केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी ठेवली जात आहेत. या प्रकरणात पक्षकारांनी दाखल केलेल्या अर्जाची संख्या मोठी आहे. या सर्व बाबींचा विचार करून सहा महिन्यांच्या आत खटल्याचा निकाल देणे शक्य नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
हे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना सुनावणीसाठी अॅड. बिडकर विशेष सरकारी वकिलांना साहाय्य करू शकतात. त्यांचे काही म्हणणे असेल, तर त्यांनी लेखी स्वरूपात सादर करावे, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:02 am