विज्ञानातील संकल्पनांमागचे गणित समजावून विज्ञान आणि गणिताची भीती कमी करणारे ‘सहजसाध्य गणित’ या प्रदर्शनाचे फग्र्युसन महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन जर्मनीचे डेप्युटी काऊन्सेल जनरल मिशेल ओट यांच्या हस्ते सोमवारी झाले.
या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, गोएथ इन्स्टिटय़ूटच्या अलिसिया प्रेडोल, सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ, फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी उपस्थित होते.
फग्र्युसन महाविद्यालयाच्या जर्मन विभागाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘गोएथ इन्स्टिटय़ूट-मॅक्समूलर भवन’ च्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १० जुलैपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रदर्शन फग्र्युसन महाविद्यालयामध्ये पाहता येणार आहे. ६ आणि ७ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान आणि बाकीच्या दिवशी दुपारी ४ ते ५ या वेळेत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
 या प्रदर्शनामध्ये मांडलेली कोडी, खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताचे मर्म उलगडले जाईल. गणिताच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित बहुगुणी आरसा, द्विभागी मनोरा, टॅनग्रॅम, सोमा क्यूब, लिओनाडरे ब्रिज, मोझार्टचा सांगीतिक फासा, पायथागोरसचा सिद्धांत, मिरर बुक अशा खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिती संकल्पनांची ओळख या प्रदर्शनातून होते.