रंगीबेरंगी फुले.. हिरवळीवर मनसोक्त नाचणारे मोर.. चॉकलेट-आइस्क्रीमची दुनिया.. अशी तब्बल पाचशे चित्रे देवदासी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी रेखाटली आहेत. कॅनव्हासवर चितारलेल्या या चित्रांमध्ये रंगांची मुक्त उधळण या मुलांनी केली आहे आणि या चिमुकल्यांचा हा कल्पनाविष्कार बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांना पाहायला मिळत आहे.
प्रदर्शनात पाचशे चित्रांचा समावेश आहे. तीन रंगांच्या माध्यमातून निसर्गप्रेमी भारत, दांडिया खेळणाऱ्या मुली, पक्षी आणि प्राण्यांचे जीवन, आरोग्याचा संदेश, तब्येतीची काळजी, महिलांचे सबलीकरण असे अनेक विषय चित्रांच्या आणि कोलाजच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे. पहिली ते सातवीतील मुलांनी ही चित्रे काढली असून, प्रदर्शनाच्या या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. बुधवार पेठेतील श्री समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या नूतन समर्थ विद्यालयातील मुलांनी काढलेल्या चित्रांच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. देवदासी आणि कष्टकऱ्यांची मुले या शाळेत शिक्षण घेतात. त्यांनी काढलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन शुक्रवार (२० नोव्हेंबर) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरू राहणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात चित्रकार लाहोटी म्हणाले, की संशोधनवृत्ती ही लहानपणापासूनच मुलांमध्ये असते. ही वृत्ती ते चित्रांच्या माध्यमातून मांडत असतात. स्पर्धा ही मुलांसाठी आत्मविश्वास वाढविण्याचे माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्पध्रेमध्ये सहभागी होऊन आत्मविश्वास वाढवायला हवा. अभ्यासासोबतच छंद जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यातून त्यांचे करीअर शोधण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा.