पुणे : पवित्र संके तस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे वय जास्त असलेल्या अनेक उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम भरून देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित न केलेल्या, आता नव्याने प्राधान्यक्रम देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये दुरुस्ती करता येणार नसल्याने उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या उमेदवारांनी  पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने पवित्र संके तस्थळाद्वारे दिली आहे.