राज्यातील विविध जिल्ह्यात मागीत तीन वर्षांत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदानातून पाणी समस्या सोडवण्यात मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे. या श्रमदानात प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतल्यास महाराष्ट्र दुष्काळ आणि टँकरमुक्त होईल, असं वक्तव्य अभिनेता आमिर खानने केलं आहे. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील २४ जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पानी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे संस्थापक शा. ब. मुजूमदार, अभिनेते गिरीष कुलकर्णी उपस्थित होते.

वाचा : मी शाहरुखचा ‘स्वदेस’ पाहिलाच नाही- आमिर खान

‘पानी फाऊंडेशनने जेव्हा सुरुवातीच्या काळात श्रमदान करण्याचं काम केलं, तेव्हा गावाची परिस्थिती भीषण होती. अनेक गावांत शेतीसाठी पाणी नव्हतं. मात्र आता ज्या गावांमध्ये पाणलोटचं काम करण्यात आलं, त्या गावातील पाणीप्रश्न मिटला आहे,’ असं आमिर म्हणाला. येत्या १ मे रोजी २४ जिल्ह्यांत श्रमदान होणार असून त्यावेळी सहभागी होणार असल्याचंही आमिरने सांगितलं. त्याचप्रमाणे शहरातील तरुणांनाही या श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन आमिरने यावेळी केलं.