चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. मयत झालेला व्यक्ती रंगकामाचा ठेकेदार होता. कामगार न आल्याने त्या दिवशी तो स्वतः पेंटिंगचे काम करत होता. त्यावेळी अचानक चौथ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. राधेश्याम रामबच्चन वर्मा असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून ३३ वर्षांचा होता. याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लहान भाऊ राकेश वर्मा याने पोलिसात फिर्याद दिली आहे. राधेश्यामच्या मागे पत्नी आणि मूल असून घरातील कमावती व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला राधेश्याम वर्मा हा रंगकामचे कंत्राट घेत होता. आरोपी असलेल्या बांधकाम व्यवसायिकाकडे मागील काही वर्षांपासून तो रंगकामाचा कंत्राटदार म्हणून काम करायचा. कामगारांच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम वर्मा करत असे. हिंजवडी पोलीस हद्दीतील स्वस्तिक मानस साईट येथे कामगार न आल्याने राधेश्याम याला काम करावे लागले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राधेश्याम हा बाहेरून पेंटिंगचे काम करत होता. अचानक तो जमिनीवर कोसळला, त्याला जखमी अवस्थेत तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशाप्रकारे इमारतीचे पेंटींग करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आली नसल्याने तसेच त्यानेही सेफ्टी बेल्ट किंवा हेल्मेट न घातल्याने ही वेळ उद्भवली.