संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालख्यांच्या मुक्कामाने पुण्यनगरीने वारकऱ्यांचा भक्तिभाव तर अनुभवलाच, पण या भक्तिभावाला पुणेकरांनी सेवाभावाची जोड देत विविध माध्यमातून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. शनिवारी दिवसभर त्याचीच प्रचिती मिळाली. वारकऱ्यांकडून भजन व अभंगातून विठ्ठलनामाचा गजर सुरू असतानाच वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था.. मोफत नेत्र व आरोग्य तपासणी.. मोफत कटिंग-दाढी.. थकलेल्या पायांचा मसाज.. उसवलेल्या कपडय़ांची शिलाई.. छत्री दुरुस्ती.. अशा माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करीत पुणेकरांनी त्यांच्यामध्येच सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले.
माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरामध्ये तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये मुक्कामास आहे. त्यामुळे पूर्व भागासह शहरामध्ये भक्तिमय वातावरणाची अनुभूती शनिवारी आली. वारक ऱ्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी टाळ-मृदंगाच्या निनादात अभंगाचे सूर ऐकू येत होते. मंदिरामध्ये पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांचे दर्शन सुरूच होते. दरम्यान वारकऱ्यांनी शनिवारवाडा, सारसबाग, पर्वती अशा स्थळांना भेट दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी वारक ऱ्यांची रांग लागली होती.
शाहीर िहगे लोककला प्रबोधिनी व सेवा मित्र मंडळातर्फे सलग बारा तासांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, कीर्तनकार तारा देशपांडे, शाहीर दादा पासलकर त्या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत दाढी-कटिंगची सेवा देण्यात आली. हिराराज प्रतिष्ठानकडून जय हनुमान प्रासादिक िदडीत टाळांचे वाटप करण्यात आले.
नारायण पेठेतील योगेश तिवारी मित्र परिवारातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिव-राणा प्रतिष्ठानतर्फे पालखीमध्ये सहभागी झालेल्या िदडय़ांना औषध पेटीचे वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान व जाणीव सामाजिक संघटनेच्या वतीने पालखी सोहळ्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची होळी करून तंबाखूमुक्तीचा संदेश दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी पवनापथावर स्वच्छता करून व पथनाटय़ाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. उपमहापौर आबा बागूल यांच्या वतीने शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात पर्जन्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्यात वारकऱ्यांनी सहभाग घेतला.
ब्रह्मांडिनीयोग सेवाभावी संस्थेतर्फे वारक ऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. युनियन क्रिकेट क्लबतर्फे शनिवार पेठ येथे मुक्कामास असलेल्या वारक ऱ्यांना भोजन देण्यात आले. कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व नाष्टय़ाची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे अडीच हजार स्टीलच्या ग्लासचे वाटप करण्यात आले. रास्ता पेठेतील समर्थ व्यायाम मंडळाने ३०० वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. भारिप बहुजन महासंघाने वारकऱ्यांसाठी फराळ व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. अनिल अगावणे संचालित पुणे पालिका सार्वजनिक वाचनालयातर्फे वारकऱ्यांना वृत्तपत्राचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धायरी, िहगणे, आनंदनगर परिसरात मुक्कामासाठी आलेल्या वारक ऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गोखलेनगर येथील संत रामदास विद्यालय येथे माजी नगरसेविका पद्मजा गोळे यांनी वारक ऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. श्री संताजी ब्रिगेडतर्फे वारक ऱ्यांना चहा-बिस्किटे आणि न्याहारी देण्यात आली. सदानंद शेट्टी मित्र परिवाराने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. शिवसेनेच्या वतीने पाचशे वारकऱ्यांच्या भोजनव्यवस्थेसह मोफत आरोग्य तपासणी व चष्मेवाटप करण्यात आले.
 पालखी मार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद
माउली आणि तुकोबांच्या पालख्या पुणे मुक्कामानंतर रविवारी पहाटे मार्गस्थ होणार असल्याने पहाटे पाच वाजल्यापासून सोलापूर रस्ता व पालखी मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. पालखी पुढे गेल्यानंतर वाहतुकीसाठी रस्ते खुले केले जातील, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून रामोशी गेट पोलीस चौकी, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौकी, सोलापूर रस्त्याने गाडीतळ येथून सासवडकडे जाणार आहे. तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर येथून अरुणा चौक, समाधान चौक, रामोशी गेट पोलीस चौकी, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट, सोलापूर रस्त्याने हडपसर येथून उरुळी कांचनकडे जाणार आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे.
पालखीत विद्यार्थ्यांकडून पर्यावरण जागृती
पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी पालखी सोहळ्यात पन्नास हजार शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आळंदी ते पंढरपूर दरम्यान प्लॅस्टिक कचरामुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची शनिवारी सुरुवात झाली. क्रिएटिव्ह सेंटर पर्यावरण दक्षता कृती मंचाचे प्रशांत अवचट यांनी याबाबत माहिती दिली. पालखी सोहळ्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर वाढत आहे. त्या पाश्र्वभूमीवर पालखीमध्ये कचरामुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. सासवड, जेजुरी, वाल्हे, फलटण, लोणंद, तरडगाव, वाखरी, नीरा अशा वीस ठिकाणी शाळांमधून प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.