पुण्याच्या डॉ. पल्लवी प्रसाद आणि खुशी कौशल यांनी मिस अ‍ॅण्ड मिसेस टियारा इंडिया या सौंदर्य स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत. पल्लवी यांना मिसेस इंडिया ग्लोबल २०१८ आणि मेसेस टियारा इंडिया ब्युटी विथ पर्पज आणि खुशी हिला मिस टीन इंडिया ग्लोबल २०१८ किताब मिळाला आहे.

मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत पल्लवी आणि खुशी यांनी किताब प्राप्त केले आहेत. पल्लवी या व्यवसायाने डॉक्टर असून मेनोपॉज, हार्मोनल इम्बॅलन्स आणि मुलांमध्ये निर्माण होणारे नैराश्य या विषयावर सध्या त्यांचा अभ्यास आणि काम सुरू आहे. त्या नृत्यांगनाही आहेत. खुशी ही डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये अकरावी वाणिज्य शाखेत शिकत आहे. तिने आतापर्यंत विविध कार्यक्रम, पथनाटय़ांमधून सादरीकरण केले आहे. सिनेक्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे खुशी हिने सांगितले.

‘डॉक्टर म्हणून कार्यरत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. चाळीस आरोग्य शिबिरे आणि महिलांसंबंधी अनेक कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. सौंदर्य स्पर्धेतही आव्हान म्हणून सहभाग घेतला होता. स्पर्धा जिंकल्याने आत्मविश्वास मिळाला आहे,’ असे पल्लवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.