मानवी हस्तक्षेप टाळून आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश; नाममात्र शुल्क प्रस्तावित

पुणे : महापालिकेचे प्रस्तावित पार्किंग धोरण अद्यापही कागदावर असले तरी या पार्किंग धोरणाला पूरक ठरेल असे स्मार्ट पाऊल पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) उचलले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी या भागात पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविताना मानवी हस्तक्षेप टाळून आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल असा पर्याय स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणार आहे.  त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिकेने पार्किंग धोरणाला मान्यता दिली आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांवर दिवसरात्र सशुल्क आकारणी होणार आहे. मात्र दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांसाठी किती दर असावा यावरून महापालिकेतील राजकीय पक्षांमध्ये मोठे मतभेद झाले होते. त्यामुळे सरसकट सर्व रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याऐवजी शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात यावी आणि दर निश्चितीसाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत घेण्यात आला. मात्र अद्यापही रस्ते आणि दर निश्चिती झालेली नसून महापलिकेचे धोरणही कागदावरच राहिले आहे. मात्र या धोरणाची अंमलबजावणी करताना पूरक ठरतील, असे पर्याय राबविण्यासाठीच्या हालचाली स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू झाल्या आहेत.

शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविताना रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला होता. त्या वेळी स्मार्ट सिटीमधील औंध-बाणेर-बालेवाडी या भागातील काही रस्त्यांचे सर्वेक्षण करावे, अशी सूचना स्मार्ट सिटीकडून महापालिकेला करण्यात आली होती. मात्र महापालिकेकडून त्याबाबत स्मार्ट सिटीला काहीच कळविण्यात आले नव्हते. त्यामुळे अखेर महापलिकेच्या पार्किंग धोरणाला पूरक ठरेल, असे पर्याय असणारी योजना औंध-बाणेर आणि बालेवाडी भागातील रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याची कार्यवाही स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याला देशभरातील सोळा कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून सहा कंपन्यांनी मोफत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मानव विरहित, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेची बचत करणे हा उद्देश यातून साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे ठेवणे, वाहनचालकांना शिस्त लावणे आणि पार्किंगचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचे यामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे.

शिस्तीला प्राधान्य

भविष्यात महापालिकेने दर निश्चिती केल्यानंतर या भागातील उत्पन्न महापालिकेलाच मिळणार आहे. उत्पन्न मिळविणे हा या योजनेचा भाग नाही. वाहतुकीला शिस्त लागावी, पार्किंगसाठीच्या जागा उपलब्ध व्हाव्यात, तंत्रज्ञानाचा वापर होऊन माफियांवर नियंत्रण ठेवता यावे, हा या मागील प्रमुख उद्देश आहे.

स्मार्ट सिटीमधील औंध-बाणेर-बालेवाडी या भागातील पार्किंगसंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पार्किंग धोरणाची अंमलबजावणी आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रयत्नशील आहे. त्यासाठी नाममात्र एक रुपया दराने आकारणी होणार आहे. महापालिकेचे दर निश्चित झाल्यानंतर त्याप्रमाणे भविष्यात आकारणी करण्यात येईल. महापालिकेच्या प्रस्तावित धोरणाला ही योजना पूरक ठरेल.

– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी