अद्याप काही जनांचे अहवाल येणे बाकी असून प्रवाशी थेट घर गाठत असल्याने चिंता वाढत आहे

पिंपरी-चिंचवड शहरात इंग्लंडमधून आलेला प्रवाशी करोना बाधित असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर शहरातील भोसरीमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात आत्तापर्यंत ११५ प्रवाशी आले असून पैकी १५ जण हे शहराबाहेरुन गेले असल्याचं महानगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर, १५ जनांचा पत्ता अपूर्ण असल्याने  त्यांच्यापर्यंत महानगर पालिकेचे पथक पोहचू शकलेले नाही.

इंग्लंड देशात कोरोनाने कहर केला असून त्याठिकाणी दुसरी लाट आल्याचं नुकतीच जाहीर करण्यात आलं आहे. दुसऱ्या लाटेत आलेला करोना विषाणू अधिक प्रभावशाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी इंग्लंड येथे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान, इंग्लडमधून पिंपरी-चिंचवड शहरात ११५ जण आले असून पैकी, १५ जण हे शहराच्या बाहेरून गेले आहेत. तर, पंधरा जनांचे पत्ते अपूर्ण असल्याने महानगर पालिका त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाही. उर्वरित ८५ प्रवाश्यांना शोधून त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली, त्यापैकी ७० प्रवाश्यांचे अहवाल नकारात्मक आले असून एक प्रवाशी करोना बाधित आला आहे. इतरांचे अहवाल येणे बाकी असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी यांनी सांगितलं आहे. महानगर पालिकेकडून  याअगोदर परदेशातून म्हणजे इंग्लडमधून आलेले प्रवाश्यांना महानगर पालिकेने सांगितलेल्या सूचनांप्रमाणे हॉटेलमध्ये काही दिवस आयसोलेट राहायचं आहे. मात्र, प्रवाशी स्वतः हुन थेट घर गाठत असून इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे चिंतेत भर पडली आहे.