News Flash

कदम कदम बढाये जा..

लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते अविनाश छेत्री याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३० व्या तुकडीचे शानदार दीक्षांत संचलन मंगळवारी झाले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३० व्या तुकडीचे शानदार दीक्षांत संचलन
लष्कराच्या घोष पथकाने छेडलेल्या ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीतांच्या सुमधूर धून.. त्या तालावर पांढराशुभ्र गणवेश परिधान केलेल्या आणि हाती रायफल घेतलेल्या स्नातकांची थिरकणारी शिस्तबद्ध पावले.. संचलन सुरू असताना चॉपर, सुपर डिमोना आणि सुखोई विमानांचे झालेले ‘फ्लाय पास्ट’.. लष्कराच्या कडक शिस्तीचे दर्शन घडवून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३० व्या तुकडीतील स्नातकांच्या तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाची शानदार दीक्षांत संचलनाने मंगळवारी सांगता झाली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३० व्या तुकडीचे शानदार दीक्षांत संचलन प्रबोधिनीच्या अरुण खेत्रपाल संचलन मैदानावर झाले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. प्रबोधिनीचे प्रमुख कमांडंट व्हाईस अ‍ॅडमिरल जी. अशोककुमार, उपप्रमुख एअर मार्शल एस. पी. वागळे, प्राचार्य आय. पी. शुक्ला या वेळी उपस्थित होते. अविनाश छेत्री याने संचलनाचे नेतृत्व केले. या संचलनामध्ये ३१२ स्नातकांनी सहभाग घेतला. भूतान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, सुदान, न्यू गयाना, किर्जिस्तान आणि टोंगा या परदेशातील १४ स्नातकांचा त्यामध्ये अंतर्भाव होता.
प्रबोधिनीच्या १३० व्या तुकडीतील स्नातकांचे आणि त्यांच्या पालकांचे लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी अभिनंदन केले. आपल्या पाल्यांना प्रबोधिनीमध्ये पाठविण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांविषयी देशाला अभिमान असल्याचे सांगून रावत म्हणाले, भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर आहे. प्रामाणिकपणा, एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि विविधतेतून एकता ही वैशिष्टय़े असलेल्या लष्करातील जवान आणि अधिकारी हे धाडस आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. पारंपरिक पद्धतीने समोरासमोर येऊन युद्ध करण्यापेक्षाही चकमकी आणि छुपे युद्ध करण्यावर भर दिला जात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे सायबर तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन भारतीय लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उभारणी केली असली तरी लष्करी सेवेतील जवानांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून अद्ययावत राहणे गरजेचे आहे. कठोर परिश्रम, संयम आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडीवर लढण्याची क्षमता या जोरांवर तुम्ही यश संपादन करू शकाल हा विश्वास आहे.
लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते अविनाश छेत्री याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. उत्कर्ष पाण्डेय याला रौप्यपदक आणि नमन भट्ट याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. प्रबोधिनीच्या ‘एन स्क्वाड्रन’ला (नोव्हेंबर स्क्वाड्रन) ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने गौरविण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:33 am

Web Title: passing out parade of 130th nda course
Next Stories
1 हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके ‘सारंग’ चमूने उपस्थितांची मने जिंकली
2 धर्मादाय आयुक्त कार्यालयात जोरदार स्वच्छता मोहीम
3 जुन्या गाण्यांच्या बोलांसह चित्रपटांविषयीचे तपशील उलगडणारा ठेवा खुला!
Just Now!
X