केंद्रीय शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल यावर्षी देशपातळीवर घसरला असला, तरी शहरातील शाळांचा निकाल वाढला असल्याचे चित्र आहे. शहरातील बहुतेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९ ते १० श्रेयांक (सीजीपीए) मिळाले असून गेल्या वर्षीपेक्षा विद्यार्थ्यांच्या श्रेयांकात वाढ झाली असल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
पुणे महानगर पालिकेच्या एकमेव सीबीएसईशी संलग्न असलेल्या राजीव गांधी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. केंद्रीय विद्यालयांचा निकालही शंभर टक्के लागला आहे. ब्लॉसम पब्लिक स्कूलमधील २० विद्यार्थ्यांना १० श्रेयांक मिळाले आहेत, तर ४७ विद्यार्थ्यांना ९ श्रेयांक मिळाले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलचा निकालही गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगला लागला असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. या शाळेतील ९५ विद्यार्थ्यांना १० श्रेयांक मिळाले आहेत. डीएव्ही पब्लिक स्कूलमधील १४७ विद्यार्थ्यांना १० श्रेयांक मिळाले असून गेल्यावर्षी १० श्रेयांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२९ होती. वानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के, तर कोथरूड येथील शाळेतील २१ विद्यार्थ्यांना ९ श्रेयांक मिळाले आहेत. एअर फोर्स स्कूलमधील १८ विद्यार्थ्यांना १० श्रेयांक मिळाले आहेत. लेक्सिकन इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानप्रबोधिनी, संस्कृती स्कूल, इंदिरा इंटरनॅशनल, विद्याशिल्प इंटरनॅशनल स्कूल, व्हीपीएमएस या शाळांचा निकालही शंभर टक्के लागला आहे.