पारपत्र खात्याकडून नोटिसा

‘आधी पारपत्र, मग पोलीस चौकशी’ प्रक्रियेत पारपत्र मिळालेल्या पारपत्रधारकांचे पोलीस चौकशीकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यामुळे अशा अनेक पारपत्रधारकांचा पोलीस चौकशी अहवाल विरोधात गेला आहे. अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी सध्या प्रादेशिक पारपत्र खात्याकडून पारपत्रधारकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत.

अशी नोटीस मिळालेल्यांसाठी सेनापती बापट रस्त्यावरील पारपत्र कार्यालयात पुढील मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे. पारपत्र आधी मिळाले असेल तरीही पोलिस चौकशी पूर्ण करणे ही पारपत्रधारकाची जबाबदारी असते, असे प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले, ‘‘पोलीस चौकशीचा अहवाल पारपत्रधारकाच्या विरोधात दिला जाण्याची अनेक कारणे आहेत. अशा प्रकरणांमध्ये ८० ते ९० टक्के लोक पारपत्र मिळाल्यानंतर पोलीस चौकशीसाठी उपस्थित राहात नसल्याचे दिसून आले आहे. पारपत्रधारक परदेशात गेला असेल तरी असे होऊ शकते. तर काही प्रकरणांत खोटी माहिती देणे, व्यक्तीवर खटला दाखल असणे अशी

कारणे दिसत आहेत. तूर्त आम्ही ३ हजार पारपत्रधारकांना नोटिसा पाठवल्या असून पोलिस चौकशीस उपस्थित न राहिल्यामुळे त्यांचे पारपत्र अडकले असेल तर त्यांना पुन्हा पोलीस चौकशीस पाठवले जाईल. माहिती खोटी दिली असल्यास ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड वापारपत्र रद्द करण्याचीही तरतूद आहे.’’

पोलीस चौकशीचा अहवाल विरोधात गेला असल्यास पारपत्रधारकाला अडचणी येऊ शकतात. परदेशात गेल्यावर अशा पारपत्रधारकाचे पारपत्र हरवले तर तिथल्या भारतीय दूतावासाकडून पारपत्र सहजी मिळत नाही, असेही पारपत्र खात्याने म्हटले आहे.