पदपथावर वाहने लावणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून, महापालिका कायद्याच्या कलम २०८ ची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता पदपथावर वाहने लागणे संबंधितांना महागात पडणार आहे. कारवाईमध्ये दुचाकीला एक हजार, तर चारचाकीला दोन हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली जात आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी या कारवाईमध्ये ४८ वाहनांवर कारवाई करून ६६ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी याबाबतची माहिती दिली. पदपथ पादचाऱ्यांसाठी रिकामे राहिलेच पाहिजेत, ही यामागची भूमिका असल्याचे सांगून आवाड म्हणाले, पदपथ रिकामे नसल्याने पादचारी रस्त्यावरून चालतात, तेथेही कडेला वाहनांचे पार्किंग असल्याने पादचाऱ्यांची मोठी अडचण होते. त्यातून छोटे-मोठे अपघातही होतात. हे थांबविण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली असून, ती सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. विशेषत: वाहनविक्रीचा व्यवसाय करणारी मंडळी सर्रास पदपथावर वाहने उभी करतात. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कर्वे रस्त्यावरील एका शोरूमचालकावर कारवाई करून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कोथरूड भागामध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. या भागामध्ये पदपथावर लावलेल्या २२ गाडय़ांवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, चतु:शृंगी, भारती विद्यापीठ, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत पहिल्याच दिवशी ४० वाहनांवर कारवाई करून संबंधितांकडून दंडाची वसुली करण्यात आली.
पदपथांवरील अतिक्रमणांचीही पाहणी
वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी सुरू करण्यात आली असून, पदपथांच्या स्थितीबाबत आढावा घेण्यात येत आहे, असे सारंग आवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, काही दुकानदारांनी साहित्य पदपथावर मांडून ते अडविले आहेत. त्याचप्रमाणे पथारी व्यावसायिकांबाबतही पालिकेशी पत्रव्यवहार करून पदपथ रिकामे करण्याचे प्रयत्न केले जातील. काही दुकानदारांनी पदपथावर महागडय़ा फरशा बसवून घेतल्या आहेत. दुकानाची दारे बाहेरच्या दिशेला उघडून पदपथाची जागा अडवली जाते. ही बाबही पालिकेच्या लक्षात आणून देत पथपथ रिकामे करून घेण्यात येणार आहेत.