दूध आणि दुग्धजन्य आणि प्राणिज पदार्थ टाळण्यावर भर; प्राण्यांवरील अत्याचार थांबवण्यासाठी पर्याय

पुणे : शाकाहारी, मांसाहारी या आहारशैली प्रचलित म्हणून माहीत आहेत. बदलत्या जीवनशैलीचा भाग म्हणून डाएटचा आहार घेणाऱ्या वर्गामध्ये किटो डाएट, लो कार्ब डाएट असे शब्दही आता प्रचलित होत आहेत. या बरोबरीने गेल्या काही वर्षांत अनेक जण वेगन आहारशैलीला पसंती देत आहेत.

वेगन आहारशैलीच्या पुरस्कर्त्यां दर्शना मुजुमदार म्हणाल्या, गेल्या काही वर्षांमध्ये वेगन आहारशैली स्वीकारली जात आहे. मी पूर्वी कट्टर मांसाहारी या वर्गात मोडत असे. वेगन आहारशैलीचा अभ्यास केल्यानंतर केवळ विचार म्हणूनच नव्हे तर शरीराच्या पोषणासाठी देखील हा आहार योग्य असल्याचे लक्षात आले. वेगन शैली अंगीकारल्यानंतर मांसाहाराचा त्याग केला. त्याबरोबरच दूध आणि दुग्धजन्य पदार्थही रोजच्या आहारातून वगळले. माझ्या संपूर्ण कुटुंबाने वेगन आहारशैली स्वीकारली असून, प्राण्यांवरील अत्याचार थांबवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

वैदेही सूर्यवंशी मूळच्या शाकाहारी आहेत, मात्र बाजारात मिळणारे अनेक पदार्थ अनेक दिवस खराब होत नाहीत, कारण त्यांच्यावर अनेक प्रक्रिया केलेल्या असतात हे लक्षात येताच त्यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारातून वगळले. कुटुंबीयांसाठी घरी देशी गायीचे ए टू दूध आणि स्थानिक पातळीवर पिकवले जाणारे पदार्थ घेण्यावर भर त्या देतात.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, वेगन आहारशैलीमुळे आहारात होणारे बदल हे प्रत्येकाच्या शारीरिक पोषणासाठी उपयोगी ठरतीलच असे नाही. मांसाहार न करणाऱ्यांसाठी दूध हे पूर्णान्न मानले जाते. आहारातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वगळणाऱ्या नागरिकांमध्ये काही काळानंतर जीवनसत्त्वांचा अभाव दिसतो. मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये वेगन आहारशैलीचा सकारात्मक परिणाम दिसल्याची उदाहरणे आहेत, मात्र ही आहारशैली कायमस्वरूपी अंगीकारणे अनेकांना अवघड जात असल्याचे आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

वेगन आहाराची वैशिष्टय़े

* दूध, दही, ताक, लोणी, तूप, पनीर, चीज आहारातून संपूर्ण वगळणे.

*  दुधाला पर्याय म्हणून सोया दूध, बदाम किंवा काजूचे दूध वापरणे.

*  पनीरला पर्याय म्हणून टोफू तर चीजला पर्याय म्हणून काजूचे चीज.

*  डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये आहारात समाविष्ट करणे.

* चहा, कॉफीला पर्याय म्हणून फळांचे रस, ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक कॉफी पिणे.

प्राणिज पदार्थ किंवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा समावेश नसलेल्या आहारशैलीला वेगन आहारशैली असे म्हटले जाते. वनस्पतिजन्य आहार असेही याला संबोधतात. १९४४ मध्ये इंग्लंडमध्ये दूध आणि प्राणिज पदार्थमुक्त आहाराच्या पुरस्कारासाठी वेगन सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या वेळी डोनाल्ड वॉटसन या सहसंस्थापकांनी वेगन हा शब्द प्रथम वापरल्याची माहिती उपलब्ध आहे.

वेगन आहारशैली कशासाठी

* प्राण्यांविषयी असलेल्या प्रेमाची भावना.

* पर्यावरणाचे संवर्धन करण्याची भावना.

* प्राणिज, दुग्धजन्य पदार्थाची मानवाला गरज नाही ही भावना.

* अहिंसेचे तत्त्व अंगीकारण्यासाठी.

* आहारात सेंद्रिय

पदार्थाचा समावेश करण्यासाठी.