पुणे : केवळ ५० टक्के प्रेक्षकांसमोर नाटक सादर करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये सवलत मिळावी अशी नाट्यनिर्मात्यांची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे नाट्यगृहांना परवानगी मिळाली असली तरी नाटकाचे प्रयोग केव्हा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली नाट्यगृहे सुरू करण्यासाठी मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला (४ नोव्हेंबर) राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, गर्दी टाळण्याच्या उद्देशातून ५० टक्के प्रेक्षकांसमोर नाट्यप्रयोग सादर करण्याचे बंधन शासनाने घातले आहे. आर्थिकदृष्ट्या हे गणित जुळत नसल्याने प्रयोग सादर करण्यासाठी शासनाने नाट्यगृहांचे भाडे निम्मे आकारावे, अशी मागणी नाट्यनिर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे परवानगी मिळाल्यावर १५ दिवस उलटून गेल्यानंतर पुण्यामध्ये एकाही नाटकाचा प्रयोग होऊ शकलेला नाही. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबर रोजी नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मिळाल्याचा आनंद कलाकारांनी साजरा केला होता. मात्र, त्यानंतर गेल्या १५ दिवसांमध्ये शहरातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृह या महापालिकेच्या तर, भरत नाट्य मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर या खासगी नाट्यगृहांमध्ये अद्याप नाटकाचा प्रयोग झालेला नाही.

डिसेंबरमध्येच प्रयोग होण्याची शक्यता

महापालिका नाट्यगृहांच्या स्वच्छता आणि अन्य कामांच्या निविदा प्रक्रिया विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये सापडल्या आहेत. ३ डिसेंबरनंतर या कामांच्या निविदा काढून कामांची पूर्तता केली जाणार आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाट्यगृहांच्या स्वच्छतेची कामे केली जात आहेत, अशी माहिती महापालिका रंगमंदिरे मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी दिली. नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याची नाट्यनिर्मात्यांनी केलेल्या मागणीसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे तसेच नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षक येतील का, याची धास्ती असल्यामुळे नाट्यप्रयोग होत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दोन प्रयोगांची घोषणा

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग १२ आणि १३ डिसेंबरला पुण्यात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी समाजमाध्यमांतून दिली आहे. ‘आनंदाची बातमी – नाटक अनलॉक ’अशा मथळ्याखाली दामले यांनी ही माहिती प्रसिद्ध के ली असून प्रयोग कोणत्या नाट्यमंदिरात होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी कोणत्याही संस्थेकडून विचारणाच झाली नाही. जानेवारीमध्ये एका नाट्यस्पर्धेबाबत चौकशी झाली असली तरी आयोजक संस्थेचा अर्ज आलेला नाही.    – आनंद पानसे, अध्यक्ष, भरत    नाट्य मंदिर

नाट्यप्रयोगाबाबत अद्याप विचारणा झालेली नाही. प्रेक्षक येतील का अशी धास्ती असल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत नाटकाचे प्रयोग होण्याची शक्यता वाटत नाही. – अतुल वायचळ, व्यवस्थापक,  टिळक स्मारक मंदिर