पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा नवा उच्चांक

पुणे : इंधनाच्या दरांचा भडका शमण्याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही. भरमसाठ शासकीय कर-अधिभार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमतींमुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुणे शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. ११ फेब्रुवारीला शहरात पेट्रोल ९४ रुपये लिटरवर पोहोचले, तर डिझेलच्या दराने ८३ रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच पेट्रोल आणि डिझेलमधील दराचे अंतर दहा रुपयांच्या आसपास आले आहे.

नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्याने इंधनाच्या दरांमध्ये हळूहळू वाढ सुरू झाली. २० नोव्हेंबरला पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८७.६७ रुपये, तर डिझेलचे दर ७५.७१ रुपये होते. त्यात दोन ते तीन आठवडय़ांतच मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. शहरामध्ये सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेले होते. काही दिवस पेट्रोल ९१ ते ९३ रुपये लिटरने मिळत होते. नागरिकांची आंदोलने झाल्याने त्या वेळी शासनाकडून इंधनावरील करांत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेट्रोलच्या दराने पुन्हा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सातत्याने काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच राहिले. १४ जानेवारीला पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला.

पेट्रोल-डिझेल दरांतील अंतर दहा रुपयांजवळ

सध्या पेट्रोलसह डिझेलच्या दरातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही इंधनाच्या दरातील अंतर कमी होत चालले होते. पूर्वी दोन्ही इंधनांच्या दरातील अंतर २० ते २५ रुपयांच्या आसपास होते. २०१८-१९ नंतर हे अंतर कमी होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोल ८० रुपयांपर्यंत असताना डिझेलचा प्रतिलिटर दर ६१ ते ६२ रुपये होता. सन २०२० मध्ये दरातील अंतर १० ते १३ रुपयांपर्यंत आले. जून २०२० मध्ये पेट्रोल ८३ रुपये लिटर असताना डिझेलचा दर ७२ रुपयांवर होता. सध्या मात्र दरातील हे अंतर आणखी कमी झाले आहे. पेट्रोल ९४ आणि डिझेल ८३.३१ रुपये झाल्याने दोन्ही इंधनाच्या दरातील अंतर दहा रुपयांच्या आसपास आले आहे.

पुण्यातील इंधनाचे दर

(प्रतिलिटर दर रुपयांत)

दिनांक          पेट्रोल      डिझेल

२० नोव्हेंबर     ८७.६७      ७५.७१

३० नोव्हेंबर     ८८.६९      ७७.४७

४ डिसेंबर       ८९.१९       ७८.१५

७ डिसेंबर       ९०.००      ७८.९७

१४ जानेवारी     ९१.००   ८०.०६

२३ जानेवारी     ९१.९५    ८१.०९

४ फेब्रुवारी      ९२.८५     ८२.०७

५ फेब्रुवारी      ९३.१४     ८२.३८

११ फेब्रुवारी     ९४.००    ८३.३१