बोअरवेलमधून पेट्रोल येत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने मोशी डुडुळगावात रविवारी तो चर्चेचा विषय ठरला. प्रत्यक्षात, पेट्रोल पंपातून गळती झाल्याने शेतजमिनीत झिरपलेले पेट्रोल बोअरवेलद्वारे बाहेर पडत होते, हे नंतर उघड झाले. डुडुळगाव येथे शिवाजी तळेकर यांच्या शेतजमिनीत बोअरवेलमधून पेट्रोल येत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. प्रत्यक्षात, वस्तुस्थिती वेगळीच होती. शेतीलगत पेट्रोलपंप आहे. तेथील पेट्रोल साठवणी टाकीला गळती झाली होती. त्यामुळे पेट्रोल शेतीत झिरपले होते. शेजारीच असलेल्या बोअरवेलमधून हे पेट्रोल पाण्यासह वर येऊ लागले होते. भातशेतीसाठी पाणी देणाऱ्या तळेकर यांना काहीतरी करपल्याचा वास येत होता. त्यांनी सखोल पाहणी केल्यानंतर बोअरवेलमधून पेट्रोल बाहेर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

जवळपास १५ दिवस हा प्रकार सुरू होता. त्यामुळे त्यांची मोटारही बिघडल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराची चित्रफीत प्रसारित झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून बोअरवेलद्वारे पेट्रोल येत होते. त्यामुळे भातशेती, बोअरवेल आणि मोटारीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पेट्रोलपंप चालकांकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.    – शिवाजी तळेकर, शेतकरी, डुडुळगाव