कर कपातीनंतर साडेतीन महिन्यांत दर पुन्हा ‘जैसे थे’

साडेतीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला शहरात पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर ऐंशी रुपयांचा आकडा ओलांडला असताना सर्वच स्तरातून पेट्रोलवरील करामध्ये कपात करण्याबाबत दबाव वाढल्याने केंद्र आणि पाठोपाठ राज्य शासनाने विक्री करात प्रतिलिटर दोन रुपयांची सूट दिली. मात्र, रोजच कमी-अधिक प्रमाणात दरांमध्ये वाढच होत असल्याचे शहरात पेट्रोलचा दर पुन्हा ऐंशी रुपयांच्या आसपास पोहोचला असल्याचे दराची स्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनुसार देशात पेट्रोलच्या किमतीमध्ये काही ठरावीक कालावधीनंतर बदल करण्याचे धोरण केंद्र शासनाने बदलल्यानंतर मागील वर्षी जून महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज जाहीर करण्यात येतात. सकाळी सहा वाजल्यापासून सर्वत्र नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाते. दरांमध्ये वाढ होताना किंवा ते कमी होताना दररोज काही पैशांचा फरक पडत असल्याने त्यातील वाढ प्रकर्षांने जाणवत नाही. मात्र, मागील साडेतीन महिन्यांतील दरांचा विचार केल्यास पेट्रोलच्या दरामध्ये पाच ते साडेपाच रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलच्या दराने चांगलीच उसळी घेतली होती. शहर आणि परिसरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ऐंशी रुपयांच्याही पुढे पोहोचला होता. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असतानाही पेट्रोलच्या दरात मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याने इंधनावर शासनाच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या विविध वाढीव करांचा मुद्दा समोर आला. त्यातून पेट्रोलवरील करात कपात करण्यासाठी शासनावर दबाव वाढू लागल्याने सुरुवातीला केंद्र शासनाने पेट्रोलवरील विक्री करात प्रतिलिटर दोन रुपयांची सूट जाहीर केली. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनेही काही प्रमाणात सूट देण्यात आली. त्यामुळे ४ ऑक्टोबरनंतर पेट्रोलचे दर ७७.५० रुपये, तर १० ऑक्टोबरला ७५.५० रुपयांपर्यंत खाली आले होते.

पेट्रोलच्या दरामध्ये पाच ते साडेपाच रुपयांची कपात झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर साडेतीन महिन्यांतच पेट्रोलचा दर पुन्हा ऐंशी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करातील कपातीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

पैशा-पैशाने महिन्यात तीन रुपयांची वाढ

पेट्रोलचे बदललेले दर सध्या दररोज जाहीर करण्यात येतात. त्यात कधी काही पैशांनी दर कमी, तर कधी ते वाढत असतात. दररोज अगदी १० ते ३० पैशांपर्यंत दरामध्ये फरक होत असतो. ऑक्टोबर महिन्यात कर कपातीनंतर ऐंशी रुपयांच्या घरातून प्रतिलिटरला ७५ ते ७६ रुपयांपर्यंत आलेल्या पेट्रोलचा दर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत कमी-अधिक होत होता. मात्र, २२ नोव्हेंबरनंतर आतापर्यंत पेट्रोलचा दर कधीच कमी न होता तो सातत्याने वाढतच राहिल्याचे दिसून येते. केवळ पैशा-पैशाने मागील एकाच महिन्यात पेट्रोलचा दर तब्बल साडेतीन रुपयांनी वाढला आहे. १० ऑक्टोबरला ७५.५३ रुपये असणारा दर सध्या ७९.१३ रुपयांपर्यंत गेला आहे.