पिंपरी- चिंचवडमधील आकुर्डी येथे तरुणाने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका महिलेला मिठी मारल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून तो सिव्हील इंजिनीअर असल्याचे समजते. त्याला मानसिक आजाराने ग्रासल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे.

गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास २९ वर्षीय महिला कामावर जात होती. यादरम्यान सागर परमाणे (वय ४०) हा तरुण रस्त्याच्या कडेला थांबला होता. पीडित महिला जवळ येताच सागरने तिला मिठी मारली. या प्रकाराने महिला घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडा-ओरडा केला. स्थानिकांनीही तातडीने महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली आणि तिची सागरच्या तावडीतून सुटका केली. नागरिकांनी विकृत सागरला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. सागर हा सिव्हील इंजिनीअर असून त्याला मानसिक आजाराने ग्रासल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार देखील सुरु होते.