पिंपरीतील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली शेरेबाजी आणि एकेरी उल्लेखाचे तीव्र पडसाद पिंपरीतही उमटले. खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी सबनीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. पंतप्रधानांचा अवमान होईल, अशी विधाने केल्याप्रकरणी सबनीस यांनी माफी मागावी, अन्यथा, साहित्य संमेलनात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. या वेळी बोलताना साबळे म्हणाले, सबनीस यांचे वक्तव्य बेताल असून पंतप्रधानांचा अवमान करणारे आहे. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. असहिष्णूतेचा डांगोरा पिटणाऱ्या तथाकथित प्रतिभावंतांनी मध्यंतरीच्या काळात आपले सन्मान, पुरस्कार परत केले. या संदर्भात, काँग्रेसने संसदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे कामकाज बंद पाडले. आता सबनीस यांनी असहिष्णू वक्तव्य केले आहे. देशभरातील तमाम बुद्धिवाद्यांनी आता सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. जोपर्यंत सबनीस माफी मागत नाही, तोपर्यंत पिंपरीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आम्ही पाय ठेवू देणार नाही.