पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाने थैमान घातले असून रात्री उशिरा पाच जण बाधित असल्याचे समोर आले आहे. यात तीन महिला आणि दोन पुरुष आहेत अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड चा आकडा वाढला असून पाच जणांची भर पडली आहे. एकूण १५ जणांना कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बधितांची संख्या ही आता ८ वर पोहचली असून पुण्याचे ७ जण पॉझिटिव्ह आहेत. यातील 3 जण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तर 5 जण भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू घेत आहेत.

पुण्यातील दुबईहून आलेला पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या ४० जणांपैकी ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक जण थायलंडहुन पिंपरी-चिंचवडला आला आहे. तो पॉझिटिव्ह निघाला असून या सर्वांवर पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व पाहता महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून रात्री उशिरा बैठक बोलावण्यात आली असून कोरोना च्या विरोधात कसे दोन हात करायचे यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, उद्योग नगरी असलेल्या शहरातील अनेक नागरिकांनी कोरोनाचा भीती ने गाव गाठले असून आज पुन्हा रुग्ण आढळल्याने याचा शहरावर नक्कीच परिणाम होण्याची चिन्हे आहेत