पिंपरीत बेपत्ता उद्योजक आनंद उनवणे यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एफएफआय चीटफंट कंपनीचे मालक ४५ वर्षीय आनंद उनवणे ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शनिवारी महाड येथील सावित्री नदीत आनंद उनवणे यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

“आनंद उनवणे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला असून शेजारील राज्यांसोबत मृतदेहाचे फोटे शेअर केले आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आणि आनंद उनवणे यांचे नातेवाईक रविवारी घटनास्थळी दाखल झाले होते. आनंद उनवणे यांच्या भावाने ५ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

“आनंद उनवणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणि क्राइम ब्रांच पथकाने तपास सुरु केला होता. आम्ही उनवणे यांचा मोबाइल ट्रॅक केला आणि त्यात समोर आलेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन शोध घेतला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “आम्हाला यामागे मोठा कट दिसत आहे. त्यांच्या मोबाइलच लोकेशन सतत बदलत होतं. मृतदेह सापडला तेथूनही त्यांचं लोकेशन दूर दाखवत होतं,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- पुण्यातला धक्कादायक प्रकार; हात-पाय बांधून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

“३ फेब्रुवारी रोजी उनवणे यानी त्यांच्या मॅनेजरला खात्यातून ४० लाख रुपये काढण्यास सांगितलं. यानंतर त्यांनी ते पैसे पिंपरीमधील फ्लॅटमध्ये पाठवण्यास सांगितलं. उनवणे यांनी चालकाला कार इमारतीजवळ पार्क करण्यासाठी तसंच पैसे पुढील सीटच्या खाली ठेवण्यास सांगितल होतं. अर्ध्या तासाने जेव्हा सेक्रेटरीने फोन केला तेव्हा त्यांनी आपण भोसरीमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कोणाचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही,” अशी माहिती क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्याने दिली आहे.