पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, शहरातील विविध भागात कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. मात्र, याचे काम संथगतीने होत असल्याचा आरोप करत १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न झाल्यास खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. अशी माहिती नगरसेवक आणि मनसे गट नेते सचिन चिखले यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजारांच्या पुढे गेली आहे. सध्याची बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, नेहरू नगर, बाल नगरी आणि चिंचवडच्या ऑटो क्लस्टर या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. पैकी, चिंचवड येथील कोविड सेंटरची पाहणी गटनेते सचिन चिखले, अंकुश तापकीर आणि इतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. तेव्हा, तिथे काम सुरू झालं नसल्याचा आरोप करत १५ ऑगस्ट पर्यंत कोविड सेंटर उभं न राहिल्यास महानगर पालिकेमध्ये खळखट्याक करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.

कोविडची वाढती संख्या पाहता व्हेंटिलेटर बेड असलेल्या कोविड सेंटरची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यानुसार महानगर पालिकेच्यावतीने चिंचवड येथे अद्यावत प्रकारचे आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र, ते उभारण्यास उशीर होत असल्याचं दिसताच मनसेकडून खळखट्याकचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे आता महानगरपालिका मनसेचा हा इशार किती गांभीर्याने घेते हे पाहावे लागेल.