पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवरून टीका होत असताना परदेशवारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवरून टीकाटिप्पणी सुरूच असतानाच, आयुक्त श्रावण हर्डीकर देखील आठवडाभरासाठी परदेश दौऱ्यावर जात आहेत. येत्या २० नोव्हेंबरला ते स्वीडनला प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. पिंपरीचे महापौर नितीन काळजे सध्या स्पेनच्या दौऱ्यावर गेले असून परतीच्या मार्गावर आहेत.

पिंपरी पालिकेत सध्या नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांचा हंगाम सुरू आहे. चिखलीतील संतपीठाच्या उभारणीसाठी विविध धार्मिक स्थळांचा अभ्यास करण्याकरिता नुकसाच अभ्यास दौरा झाला. महिला बालकल्याण समितीतील महिला सदस्यांचा नुकताच अभ्यास दौरा झाला. त्यापाठोपाठ, पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा गुजरात-अहमदाबाद येथे बीआरटी अभ्यास दौरा झाला. ‘सेन्ट्रल फॉर एक्सलेन्स इन पब्लिक ट्रान्सपोर्ट’ (सीईपीटी) यांच्या निमंत्रणानुसार आखणी  केलेल्या या दौऱ्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता. त्यापाठोपाठ, महापौर नितीन काळजे एकूण पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. स्पेन येथील बर्सिलोना शहरात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत ‘स्मार्ट सिटी एक्स्पो २०१७’ ही परिषद होती. त्यासाठी महापौरांना निमंत्रण होते. त्यानुसार, महापौर या परिषदेत सहभागी झाले. त्यासाठी पाच लाख २२ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

दौऱ्यावर गेलेले महापौर परतीच्या मार्गावर असतानाच, आयुक्त श्रावण हर्डीकर परदेशात जात आहेत. स्वीडन येथे होणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेत आयुक्त सहभागी होणार आहेत. तथापि, त्यांच्या दौऱ्याविषयी कोणी काहीही भाष्य करण्यास तयार नाही. २० नोव्हेंबरपासून आठवडाभर ते प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सनदी अधिकाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या नियमित प्रशिक्षणासाठी त्यांना पाठवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पदभार कोणाकडे?

आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडनला जाणार असल्याने कोणाकडे तरी पदभार द्यावा लागणार आहे. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची बदली झाली असून त्यांचे पद सध्या रिक्त आहेत. सहआयुक्त दिलीप गावडे वैद्यकीय कारणास्तव दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा पदभार कोणाकडे जाणार, याविषयी तर्कवितर्क आहेत.