राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेला भाजप आणि राष्ट्रवादीतील कलगीतुरा अजूनही सुरूच असल्याचे मंगळवारी दिसून आले. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांचे खंडन करतानाच राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून भाजपला फायदेशीर ठरेल, अशी प्रभागरचना करून घेतली व हे करताना राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ केल्याचा आरोप राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत केला.

िपपरी पालिकेतील गैरकारभार, स्थायी समितीतील भ्रष्टाचार, गॅसदाहिनी खरेदीतील घोटाळा यावरून भाजपने विशेषत: सरचिटणीस सारंग कामतेकर, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीवर भ्रष्ट कारभाराचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन भाजपच्या आरोपांचे खंडन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे, नाना काटे आदी उपस्थित होते. ‘स्मार्ट सिटी’प्रकरणी भाजप राजकारण करत आहे, अन्यथा िपपरी-चिंचवडचा समावेश झाला असता, असा आरोप राष्ट्रवादीने या वेळी केला. पालिका निवडणुकीसाठी करण्यात येणारी प्रभागरचना गोपनीय असते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने प्रभागरचनेची गोपनीयता राहिली नाही. शहरातील ३२ प्रभागांची रचना उघड झालेली आहे. रचना करताना काही पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांना ‘टार्गेट’ करण्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वेळी केला. वाघेरे म्हणाले, की िपपरीचा स्मार्ट सिटीत समावेश करवून घेण्यात भाजपचे आमदार-खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पानसरे म्हणाले,की भाजपकडून करण्यात येणारे आरोप खोटे आहेत. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. आरोप करण्याऐवजी चौकशी करावी. बहल म्हणाले, पत्र देणे, माहिती घेणे, सेटलमेंट करून स्वत:ची खळगी भरणे हा ‘त्यांचा’ धंदा आहे. न्यायालयात जाऊन प्रकल्पांची कामे त्यांनी बंद पाडली, शहराचे नुकसान केले. भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी त्यांनी सिद्ध करावेत.

कोण अमोल थोरात?

भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राष्ट्रवादीची बरीच प्रकरणे चव्हाटय़ावर आणली, त्या रागातून राष्ट्रवादीने ‘कोण अमोल थोरात, कोण त्याला ओळखते’, या शब्दात त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. थोरात ज्या प्राधिकरणात राहतात, तेथे त्यांना कोणी विचारत नाही. केवळ विकासकामात खोडा घालणे आणि पाडापाडीचे राजकारण हेच त्यांचे काम आहे, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली.