पिंपरी-चिंचवड काँग्रेसला वाली नाही, पक्षश्रेष्ठींचे लक्ष नाही, राज्यात सत्ता असूनही नसल्यासारखे आहे, असा त्रागा करणारे पिंपरी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर पक्षांतर करण्याच्या मन:स्थितीत असून त्यांचा ओढा शिवसेनेकडे आहे. भोइरांनी पक्षांतर केल्यास पिंपरीत मुळात कमकुवत असलेल्या काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडणार आहे. तथापि, ते बाहेर पडल्याशिवाय काँग्रेसला चांगले दिवस येणार नाहीत, असा सूरही पक्षात आहे.
गेल्या ३० वर्षांपासून ‘निष्ठावान’ आहे, असे आवर्जून सांगणारे भोईर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे समर्थक आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांनी शहरातील प्रश्नांबाबत निर्णय घेतले नाहीत म्हणून ते नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींनी पिंपरी काँग्रेसला वाऱ्यावर सोडले व राष्ट्रवादीला आंदण दिल्याची तक्रार त्यांनी अनेकदा केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. पुण्यात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षाच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा झाला, तेव्हा शहरात असूनही भोईर फिरकले नाहीत. त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होणे अवघड असल्याने त्यांना सेनेचे तिकीट हवे आहे. मात्र, ‘ठोस’ आश्वासन मिळत नसल्याने प्रवेश रखडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. भोइरांच्या हालचालींवर काँग्रेस नेत्यांचे लक्ष आहे. त्यांची हकालपट्टी करा अथवा त्यांचे शहराध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. माणिकरावांचा भोइरांना आशीर्वाद असल्याने सहन करण्याशिवाय कार्यकर्त्यांसमोर पर्याय नाही. भोईर पक्षाबाहेर गेल्यास त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तेही बाहेर पडल्यास काँग्रेसला मोठे खिंडार पडेल, असे मानले जाते. दुसरीकडे, भोइरांच्या आतापर्यंतच्या एककल्ली व राष्ट्रवादीधार्जिण्या कारभाराला वैतागलेला गट मात्र त्यांच्या जाण्याची वाट पाहतोय. भोईर बाहेर पडल्याशिवाय काँग्रेसची वाढ होणार नाही, असा त्यांचा पवित्रा आहे. वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या भोइरांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क आहेत.