आरोग्य यंत्रणेवरील ताण निवळला

पिंपरी : वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर असलेला कमालीचा ताण आता निवळताना दिसतो आहे. दररोजच्या करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत असून उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली आहे. रेमडेसिविर आणि प्राणवायूचा तुटवडा तूर्तास जाणवत नाही. कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटांची मागणी असली, तरी त्या उपलब्ध होत आहेत. मृत्यूची संख्या कमी झालेली असली, तरी सध्याची आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे.

शहरातील सध्याची करोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या घरात असून उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या सव्वादोन लाखांपर्यंत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. पालिकेच्या रुग्णालयांमधील खाटा भरू लागल्या. त्यापाठोपाठ, खासगी रुग्णालयातही खाटा मिळेनाशा झाल्या. परिणामी, रुग्णांच्या नातेवाइकांना खाटांसाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. प्राणवायू सज्ज खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रणा युक्त खाटांची प्रचंड कमतरता होती. त्यातच रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला. प्रचंड मागणीमुळे त्याचा काळाबाजार सुरू झाला. एका रेमडेसिविरसाठी ४० हजारांपर्यंत भाव पोहोचल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले. यातच मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंतेत भर टाकण्याचे काम केले. या सर्व घडामोडीत पालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला होता.

मात्र, दोन महिन्यांपासून असलेली ही परिस्थिती आता बऱ्यापैकी निवळताना दिसते आहे. एका दिवशी तीन हजारांपर्यंतची जाणारी करोना रुग्णसंख्या काही दिवसांपासून हजाराच्या आत आहे. पालिका रुग्णालयांमधील व करोना काळजी केंद्रातील निम्म्या खाटा मोकळ्या असल्याचे सांगण्यात येते. रेमडेसिविरची उपलब्धता वाढली असून प्राणवायूचा तुटवडा तूर्तास नाही. कृत्रिम श्वसनयंत्रणा खाटांची मागणी असली, तरी त्यानुसार जागा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आरोग्य वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येते.

करोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. पालिका रुग्णालये तसेच करोना केंद्रांमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत. प्राणवायू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटाही उपलब्ध होत आहेत. रेमडेसिविरची कमतरता नाही. प्राणवायूचा तुटवडा नाही. अशी दिलासादायक परिस्थिती असली, तरी यापुढेही नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे. बरे होऊन गेलेल्या रुग्णांनीही गाफील न राहता खबरदारी घेतली पाहिजे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी पालिका