मुख्यालयातील चारही लिफ्ट नादुरुस्त; नागरिकांच्या जिवाशी खेळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे व भाजपच्या तीन नगरसेविका बुधवारी सकाळी लिफ्टमध्ये अडकल्या. काही वेळातच त्यांची सुटका झाली. मात्र, सर्वाचीच पळापळ झाली. पालिका मुख्यालयात असलेल्या चारही लिफ्ट नादुरुस्त असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होऊनही आवश्यक कार्यवाही झाली नाही, परिणामी महापौरांना हा अनुभव घ्यावा लागला. अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या जीविताशी खेळ होत असल्याची भावना या संदर्भात व्यक्त करण्यात येत आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी महापौर काळजे सकाळी सव्वा दहा वाजताच पिंपरी पालिका मुख्यालयात आले होते. त्यानंतर, तळमजल्यावरून ते तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात जात होते. त्यांच्यासोबत तीन नगरसेविका, सुरक्षारक्षक, लिफ्टचालक कर्मचारी होते. मात्र, लिफ्ट सुरू होताच पहिल्या मजल्याजवळ अडकली. काही वेळ ते लिफ्टमध्ये अडकून पडले. यावेळी लिफ्टचालकाने केलेल्या प्रयत्नामुळे लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यश आले. त्यानंतर, महापौर व नगरसेविकांना उडी मारून बाहेर पडावे लागले. महापौर लिफ्टमध्ये अडकल्याची बातमी थोडय़ाच वेळेत सर्वदूर पसरली. थोडय़ा कालावधीसाठी ती लिफ्ट बंद ठेवण्यात आली होती.

या निमित्ताने मुख्यालयातील नादुरुस्त लिफ्टचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी चार लिफ्ट आहेत. मात्र, आळीपाळीने प्रत्येक लिफ्टमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महापौर अडकून पडले ती लिफ्ट महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आहे. शेजारीच असलेल्या दुसऱ्या लिफ्टमध्ये काही दिवसांपूर्वी एक पत्रकार १५ मिनिटे अडकला होता. तिसऱ्या लिफ्टमध्ये अडकून पडलेला एक पालिका कर्मचारी बाहेर पडताना जखमी झाला होता. तर, चौथ्या लिफ्टमध्ये काही महिला अडकून पडण्याचा प्रकारही घडला होता. सातत्याने लिफ्टमध्ये माणसे अडकून पडण्याचे प्रकार होत असतानाही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. महापौरच अडकल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कित्येक दिवसांपासून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. आता तरी त्यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.