पिंपरीमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध रुग्णाच्या छातीत दुखू लागल्याने डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले होते. आवश्यक चाचण्यांनंतर त्या व्यक्तीच्या छातीमध्ये अतिशय दुर्मिळ अशी कर्करोगाची मांसल गाठ असल्याचे लक्षात आले. यानंतर त्या रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हाच एक मार्ग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये किमो किंवा रेडिओ थेरपीचा उपयोग होत नाही  याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर यशस्वीरीत्या वृद्ध रुग्णाच्या छातीतून साडेतीन किलोची गाठ काढण्यात आली.

कर्करोग शल्य विभागाचे प्रमुख डॉ. समीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली डॉ. पंकज क्षीरसागर, डॉ. संकेत बनकर व डॉ.सुयश अग्रवाल या कर्करोगावरील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांकडून या रुग्णावर अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गाठ छातीच्या डाव्याबाजूला हृदय व फुप्फुसाच्या रक्त वाहिन्यांना चिकटलेली होती. या गाठेच्या दबावामुळे या दोन्ही अवयवांना रक्त पुरवठा होत नसल्याने त्याचे कार्य मंदावले होते. या अवयवांबरोबर रक्त वाहिन्यांना इजा न करता शरीरामध्ये कर्करोगाचा प्रसार रोखण्याबरोबर रुग्णाचा जीव वाचवणे आणि कर्करोगाची गाठ काढण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते.

या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी रुग्णाची पूर्ण छाती उघडून नंतर मोठ्या रक्तवाहिन्या व हृदय आणि फुप्फुस यांच्या आवरणाला चिकटलेली गाठ तेवढ्याच शिताफीने वेगळी केली. सुमारे पाच तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर वीस सेंटीमीटर लांबीची आणि साडे तीन किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले. या रुग्णावर चार दिवस अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते ७० वर्षीय या वृद्धाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा कर्करोगाचा धोका पूर्ण पणे टळला आहे. या रुग्णाला दोन दिवसांनी घरी सोडण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी भूल शास्त्र विभाग प्रमुख डॉ स्मिता जोशी यांची टीम, रेडिओलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. पी. के. लामघरे व पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. चारुशीला गोरे तसेच हृदय शल्य विभाग प्रमूख डॉ. अनुराग गर्ग व श्वसनविकार विभाग प्रमूख डॉ एम. एस. बरथवाल यांच्यासह सर्व सहकाऱ्यांची मोलाची मदत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.