आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने पिस्तुलातून स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी पिंपरीमध्ये घडली.  सचिन वांडेकर (वय- २८ रा. पिंपळे गुराव, मूळ आष्टी, जिल्हा बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो विमान नगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. परंतु, त्याने तीन दिवसांपूर्वी काम सोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. तो लहान भाऊ आणि आणखी एका मित्रांसह पिंपळे गुरव येथे राहात होता. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याच्याकडे पिस्तुल आले कोठून? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पोलीस या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा त्याचा लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि मित्र विशाल अशोक लहाने यांच्यासह राहत होता. तो पुण्यातील विमान नगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. मात्र तीन दिवसांपूर्वीच त्याने काम सोडले होते. त्यामुळे तो तीन दिवसांपासून रूमवरच असायचा.  रविवारी संध्याकाळच्या सुमारास विशाल  बाहेरून आला आणि बाथरूममधून गेला. तर लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्यात पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. विशाल बाथरूम मधून तर दीपक हा धावत वर आला. सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याने छातीवर गोळी झाडून घेतल्याचे या दोघांनी पाहिले. गंभीर जखमी अवस्थेत मित्राच्या मदतीने सचिनला औंध रूग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सचिनने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून त्याच्याकडे पिस्तुल आले कुठून याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.