पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्याचा उल्लेख केला. अटलजींच्या सरकारने ग्रामीण भागात व शहरात पायाभूत विकासावर भर दिला होता. त्यांच्याकाळात या कार्याला गती आली होती. परंतु, नंतरच्या आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विकासाचा वेग मंदावला. अटलजींच्या सरकारला आणखी काही काळ मिळाला असता तर मुंबई, पुणेसह महाराष्ट्राचा विकास वेगाने झाला असता, असे वक्तव्य मोदी यांनी केले.

२००४ ते २०१८ दरम्यान एका पिढीचे अंतर आले आहे. विचार आणि आकांक्षामध्ये अंतर निर्माण झाले आहे. केंद्र सरकार आता पायाभूत विकासाकडे लक्ष देत आहे. महाराष्ट्रात पुण्यासह ८ शहरांना स्मार्ट केले जात आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये एलइडी स्ट्रीट लाइट बसवले जात आहेत. यामुळे कोट्यवधींची वीज बचत होत असल्याचे ते म्हणाले. देशात ५०० किमीचे मेट्रोचे जाळे तयार झाले असून यात आणखी ३०० किमी मेट्रो मार्ग तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रोमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. हे सरकार पायाभूत सेवांवर भर देणारे सरकार आहे. मागील चार वर्षांत या सरकारने पायाभूत विकासासाठी मोठी गुंतवणूक केली असून मागील सरकारच्या काळात याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. अटलजींनी त्यांच्या कार्यकाळात यावरच लक्ष केंद्रीत केले होते. दुर्देवाने त्यांचे सरकार पुन्हा आले नाही. अटलजींचे सरकार पुन्हा सत्तेवर आले असते तर महाराष्ट्राचा विकास वेगानेे झाला असता, असे ते म्हणाले.