करोना संकटामुळे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर धीम्या गतीने निर्बंध शिथील करण्यात आले. पण आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन निर्माण होण्याचं संकट निर्माण झालं असून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत. एकीकडे करोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे सध्या सर्वांचं लक्ष असून अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील असं सांगितलं आहे. यादरम्यान ९८ देशांचे राजदूत ४ डिसेंबर रोजी पुण्यात येणार आहेत.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. तेथील लसची माहिती घेण्यासाठी ४ डिसेंबर रोजी १०० देशाचे राजदूत पुण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अद्यापपर्यंत निश्चित झालेला नाही. मात्र त्या संदर्भात माहिती येताच प्रशासनाकडून जाहीर केले करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्याच्या घडीला करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. “मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र सरकार प्रत्येक डोससाठी २५० रुपये खर्च करत ९० टक्के पुरवठा खरेदी करणार आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.

“भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटी डोसचं लक्ष्य ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.