महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे चार हजार ४७९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सात तासांच्या चर्चेनंतर मंगळवारी खास सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या चर्चेत वीस नगरसेवकांनी भाग घेतला. अंदाजपत्रकातील अंदाज नेहमी अंदाजच राहतो आणि तो वास्तवाशी कधीच जुळत नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली. अंदाजपत्रकावरील चर्चेत प्रशासनावरही जोरदार टीका झाली.
स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी सादर केलेले सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे अंदाज मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यावरील चर्चेला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली आणि सायंकाळी अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. सदस्यांना त्यांनी सुचवलेल्या विकासकामांसाठी तरतुदी करताना पक्षपात झाल्याची तक्रार बहुतेक सर्व सदस्यांनी यावेळी केली. उपमहापौर आबा बागूल यांनी सव्वा तासाच्या भाषणात अंदाजपत्रकावर आणि प्रशासनावर जोरदार टीका करत अनेक उणिवा स्पष्ट केल्या. गेल्या काही वर्षांत अंदाजपत्रकात शेकडो कोटी रुपयांची तूट येत असूनही ती प्रशासनाकडून मांडली जात नाही. याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न बागूल यांनी यावेळी उपस्थित केला. अंदाजपत्रक हे फक्त अंदाजच राहणार का कधी ते वास्तवात येणार अशी विचारणा करून बागूल म्हणाले की, महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागणार असून त्यासाठी अनेक योजना मी देऊनही त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
शहरभर सुरू असलेल्या खोदाईवर टीका करून मुक्ता टिळक यांनी गरज नसताना एका विशिष्ट कंपनीचे सिमेंट पाईप सर्वत्र टाकले जात आहेत आणि त्यामुळे सर्व ठिकाणी खोदाई सुरू आहे. पाईप खरोखरच बदलण्याची गरज आहे का, असा मुद्दा  मांडला. मंजूषा नागपुरे यांनी विविध विकासकामे करणे आवश्यक असतानाही त्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याचा मुद्दा मांडून अंदाजपत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली. सिमेंट रस्त्यांची कामे करण्यासाठी जे पूर्वगणनपत्र तयार केले जाते ते सदोष असते याकडे वनिता वागसकर यांनी लक्ष वेधले.
महापालिकेची थकबाकी साडेसहाशे कोटींची आहे; पण ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही योजना अंदाजपत्रकात मांडल्याचे दिसले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी केली.
उत्पन्नवाढीसंबंधीचा कोणताही विषय महापालिकेत आला की त्यात राजकारण येते आणि त्यातून नुकसान होते, असे सभागृहनेता सुभाष जगताप म्हणाले. अंदाजपत्रकावरील चर्चेला उत्तर देताना कर्णे गुरुजी म्हणाले की, सर्व सदस्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे सर्वाना शंभर टक्के तरतूद करणे शक्य नसले, तरी काही ना काही तरतूद केलेली आहे. शहराचा सर्वागीण विकास व्हावा या दृष्टीनेच अंदाजपत्रक तयार केले आहे.