महापालिका शिक्षण मंडळाबाबत राज्य शासनाने घेतला निर्णय आणि त्याचा महापालिका प्रशासनाने लावलेला अर्थ या घोळामध्ये शिक्षण मंडळाचा कारभार नेमका कोणी चालवायचा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाचे कामकाज ठप्प झाल्यासारखी परिस्थिती आहे. सद्यस्थितीत मंडळात गोंधळाची 14pपरिस्थिती असून मंडळाच्या अनेक योजनाही थांबल्या आहेत.
महापालिका शिक्षण मंडळ सदस्यांची गेल्या सहा महिन्यात सभाच झालेली नाही. तसेच विद्यार्थी गुणवत्ता सुधारणेसाठी जी सभा दरमहा होत असे ती देखील सहा महिन्यांमध्ये झालेली नाही. या संबंधी मंडळाच्या सर्व सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. मात्र, महापालिका प्रशासनाकडून सर्व विषय पूर्णत: दुर्लक्षित केले जात असल्याची सदस्यांची तक्रार आहे. मंडळाच्या आढावा बैठकीला शिक्षण प्रमुखच उपस्थित राहात नाहीत. पुढील वर्षांच्या अंदाजपत्रकासाठी जी बैठक झाली त्यालाही शिक्षण प्रमुख उपस्थित नव्हते.
शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक निर्णय प्रलंबित असून त्याबाबत चौकशी केली असता संबंधित अधिकारी थातूर-मातूर उत्तरे देत असल्याची तक्रार मंडळाचे सदस्य शिरीष फडतरे यांनी केली आहे. रजा मुदतीमधील शिक्षकांना आदेश दिला गेला नाही, त्यामुळे तेरा दिवस ९६ वर्गावर शिक्षकच नव्हते. त्याबरोबरच योग्य नियोजन नसल्यामुळे अद्यापही १३० वर्गावर शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. आवश्यक शिक्षक भरती देखील रखडली आहे. त्याबाबतही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे फडतरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शालेय वर्ष सुरू होताना म्हणजे जून महिन्यात वह्य़ा, चित्रकला वह्य़ा, अभ्यासपूरक पुस्तके, बालवाडी साहित्य, नकाशे, तक्ते, वाचन पुस्तके, तसेच चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची  पुस्तके आदी साहित्य मिळणे आवश्यक होते. ते साहित्य अद्यापही मिळालेले नाही. याबाबत विचारणा केली असता कार्यवाही चालू आहे, असे उत्तर मिळत असल्याचेही सांगण्यात आले. संगणक कक्षही बंद असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शिष्यवृत्तीही दिली गेलेली नाही. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांना तसेच रिक्षाचालकांना अद्याप बिले दिली गेलेली नाहीत. तसेच क्रीडा निकेतनमधील शिक्षकांना जून महिन्यापासून पगार दिले गेलेले नाहीत. क्रीडा निकेतनमधील विद्यार्थ्यांना पोषक आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांना बिले दिली गेलेली नाहीत तसेच या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्यही पुरवले गेलेले नाही.

शिक्षण मंडळाच्या मुदतीबाबत सध्याचे शिक्षण मंडळ त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची कार्यालये मोकळी करतील असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने या निर्णयाचा पूर्णपणे वेगळा अर्थ काढला असून स्वत:च्या हाती सर्व सूत्र घेतली आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे.
शिरीष फडतरे, सदस्य, शिक्षण मंडळ, पुणे</span>

शालेय साहित्याचे अद्याप वाटप नाही
सर्व संगणक कक्ष बंद
गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही
क्रीडानिकेतनच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य नाही
अनेक ठेकेदारांची बिले थकली
शेकडो वर्गखोल्यांची दुरवस्था