News Flash

किरकोळ वाद, तक्रारी आणि याद्यांचा घोळ

या मतदार संघातील रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर या प्रभागात बहुतांश संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.

किरकोळ वाद, तक्रारी आणि याद्यांचा घोळ
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मयूर कॉलनीतील जोग विद्यालयात मतदानाचा हक्क बजाविला.

 

किरकोळ वाद, बोगस मतदानाच्या तक्रारी, मतदार याद्यातील घोळात कोथरूड विधानसभा मतदार संघातील पाचही प्रभागात मंगळवारी मतदान झाले; पण मतदारांचा निरूत्साह यानिमित्ताने दिसून आला. मतदान केंद्राबाहेर लावलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून उमेदवारांची माहिती घेण्याचा प्रयत्नही येथे झाल्याचे दिसून आले. तसेच निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेचे स्वागत केले.

कोथरूड विधानसभा मतदार संघात बावधन-कोथरूड डेपो, रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी, एरंडवणा-हॅपी कॉलनी आणि कर्वेनगर या प्रभागांचा समावेश आहे. मोठमोठय़ा सोसायटय़ा-उच्चशिक्षितांचे अधिकचे प्रमाण, उच्चभ्रूंचे मोठे प्रमाण या मतदार संघात आहे. तसेच राजकीय दृष्टय़ाही हा प्रभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथील मतदानाबाबत सातत्याने चर्चा होती.

सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर नोकरदार, ज्येष्ठ नागरिक  मतदान केंद्रावर येण्यास सुरुवात झाली. या प्रभागात सरासरी ८०हून अधिक मतदान केंद्रे होती. या केंद्रांबाहेर मतदारांना मदत करण्यासाठी पोलिंग एजंट, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मतदानाचा वेग मोठा होता. त्यामुळे या मतदार संघातून सर्वाधिक मतदान होईल, असा अंदाज होता. मात्र दुपारनंतर परिस्थितीमध्ये बदल झाला. मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसून येत होते. संध्याकाळपर्यंत हेच चित्र कायम राहिले.सकाळच्या सत्रात मतदान करताना मात्र बहुतेक मतदारांनी उमेदवारांची माहिती घेण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. त्याबाबत मतदान केंद्राबाहेर दबक्या आवाजतही चर्चा सुरु होती.

दरम्यान काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारीही पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. या मतदार संघातील रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर या प्रभागात बहुतांश संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या प्रभागातील उत्सव मंगल कार्यालय हॉल जवळील मतदान केंद्रात बोगस मतदान करणाऱ्या एका मतदाराला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी अटकाव केला. त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मतदाराकडे रहिवासाचा कोणताही ठोस पुरावा नव्हता, तो सांगली येथील असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर शिवसेना, भाजप आणि मनसेच्या उमेदवारांनी एकत्रितपणे कोथरूड पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला. संध्याकाळीही काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 2:59 am

Web Title: pmc elections 2017 bogus voting complaints jumble in pune voters list
Next Stories
1 शिवाजीनगरमध्ये मतदारांचा उत्साह बेताचाच
2 हिरवा कोपरा : निसर्ग सौदर्यातून प्रेरणा घ्या!
3 शहरबात पिंपरी-चिंचवड : ‘श्रीमंत’ पालिका कोणाची  ‘परिवर्तन’ की ‘सत्तेची हॅट्ट्रिक’
Just Now!
X