युवक, युवतींना उच्च शिक्षण तसेच त्यांच्या अन्य प्रश्नांबद्दल समुपदेशन आणि सल्ला देण्यासाठी महापालिकतर्फे हॅलो, माय फ्रेंड ही नवी योजना सुरू केली जाणार असून या योजनेला मुख्य सभेत गुरुवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या नागरवस्ती विकास आणि युवक कल्याणकारी योजनेअंतर्गत ‘हॅलो, माय फ्रेंड’ हा उपक्रम राबवला जाईल. या योजनेला मंजुरी देण्याचा विषय मुख्य सभेपुढे गुरुवारी ठेवण्यात आला होता. त्याला सभेत मंजुरी देण्यात आली. उपमहापौर आबा बागूल यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार करण्यात आली असून भवानी पेठेत बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले स्मारकाच्या वास्तूमध्ये या योजनेचे केंद्र सुरू केले जाणार आहे. या योजनेसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. या क्रमांकावर फोन केल्यास युवकांना त्यांच्या प्रश्नांबद्दल सल्ला देण्याची तसेच मार्गदर्शन करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.