महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी यंदाही विलंब होणार असून या शिष्यवृत्तीसाठी पालिकेकडे तब्बल बारा हजार अर्ज आले आहेत. अर्जाची छाननी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि आवश्यक तरतूद उपलब्ध होणे याचा विचार करता गुणवंतांना नव्या वर्षांतच शिष्यवृत्ती मिळेल, अशी शक्यता आहे.
पुणे शहरात राहणारे जे विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्यांवर गुण मिळवतात त्यांना महापालिकेतर्फे ही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत पंधरा हजार, तर बारावीच्या गुणवंतांना पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या शिष्यवृत्तीसाठी महापालिकेकडे बारा हजार अर्ज आले आहेत. दहावीच्या नऊ हजार विद्यार्थ्यांनी आणि बारावीच्या तीन हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
आलेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया आता करण्यात येणार असून त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातील. पात्र विद्यार्थी ठरवण्याबरोबरच या शिष्यवृत्तीसाठी आर्थिक तरतूदही उपलब्ध करावी लागणार आहे. सध्या या शिष्यवृत्तीसाठी अंदाजपत्रकात जेवढी तरतूद करण्यात आली आहे ती कमी पडणार असल्यामुळे अंदाजपत्रकातील निधीचे वर्गीकरण करून ही तरतूद उपलब्ध करून घ्यावी लागेल. अर्ज छाननी व अन्य प्रक्रिया सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे शिष्यवृत्तीचे वाटप लांबणार आहे. त्यामुळे नवीन वर्षांतच या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल असा अंदाज आहे. शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज महापालिकेत तसेच पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वीकारण्यात येतात. त्या बरोबरच यंदा ऑनलाईन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, या सुविधेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या सुविधेअंतर्गत आठशे सव्वीस विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.