स्वारगेट परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी करण्यात आलेल्या जोरदार कारवाईत ४५ स्टॉल उखडण्यात आले. या स्टॉलधारकांचे महापालिकेनेच पुनर्वसन केले होते तसेच त्यांना परवाना व ओळखपत्रही दिले होते. मात्र दिलेल्या परवान्यानुसार संबंधित व्यावसायिक व्यवसाय करत नसल्याचा दावा करत सर्व स्टॉल पाडून टाकण्यात आले. स्वारगेटच्या गजबजलेल्या भागात या कारवाईमुळे सकाळी तणाव होता. प्रशासनाने केलेली ही कारवाई सूडबुद्धीने आणि नियमबाह्य़ पद्धतीने केल्याचा आरोप उपमहापौर आबा बागूल आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी केला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकासमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास महापालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन धडक कारवाईला प्रारंभ केला. या सर्व स्टॉलधारकांचे महापालिकेनेच पुनर्वसन केले असून त्यांना जागाही महापालिकेनेच दिल्या आहेत. या भागात रस्तारुंदी करण्यासाठी या स्टॉलधारकांना मागे जागा देण्यात आल्या होत्या. तसेच या सर्वाकडे नोंदणी प्रमाणपत्र आणि अधिकृत स्टॉल असल्याचेही पत्रही होते. संबंधित व्यावसायिक गेली तीस वर्षे या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. या भागात कारवाई सुरू होताच व्यावसायिकांनी कारवाईला विरोध केला. मात्र, स्टॉल पाडण्याची कारवाई सुरू ठेवण्यात आली. स्टॉल पाडले जात असताना अनेक स्टॉलमधील साहित्य रस्त्यावरच फेकून देण्यात आले.
महापालिका प्रशासनाने अधिकृत स्टॉलधारकांवर कारवाई केली असून ती सूडबुद्धीने केल्याचा आरोप उपमहापौर आबा बागूल आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या कारवाईत नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आता त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेने केलेली कारवाई योग्यच असून संबंधित व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तसेच फेरीवाला धोरणानुसार व्यावसायिकांचे पुनर्वसन करायचे असल्यामुळे कारवाई करण्यात आली, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पुनर्वसनासाठी स्टॉल हलवणे आवश्यक होते असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.