कात्रज ते हडपसर या मार्गावरील बीआरटी अद्यापही प्रायोगिक अवस्थेत असताना आता आळंदी रस्ता तसेच खराडी येथे बीआरटी सुरू करण्याची घाई पीएमपी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. सुरक्षितता तसेच अन्य अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करून प्रकल्पाचे काम अर्धवट व अपूर्ण असतानाही बीआरटी सुरू करण्याचा घाट या दोन मार्गावर घालण्यात आला आहे.
बीआरटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आळंदी रस्त्यावर तसेच नगर रस्त्यावर बीआरटीची चाचणी नुकतीच करण्यात आली. मात्र, या चाचणीतच अनेक त्रुटी उघड झाल्या. या त्रुटींकडे दुर्लक्ष करून बीआरटी सुरू करू नये. तसेच या आधीच्या पथदर्शी प्रकल्पातून निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीचाही विचार करावा. त्रुटींची समाधानकारक पूर्तता केल्याशिवाय हे मार्ग सुरू करण्याची घाई करू नये. अन्यथा पुण्यातील बीआरटी पूर्णत: अपयशी होण्याचा धोका नाकारता येत नाही, असे निवेदन पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी महापौर चंचला कोद्रे, महापालिका आयुक्त महेश पाठक आणि पीएमपीच्या संचालकांना दिले आहे.
कात्रज ते हडपसर या पथदर्शी बीआरटी प्रकल्पात ज्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते, त्यांची पूर्तता सात वर्षे उलटूनही झालेली नाही. या प्रकल्पाची सुरुवात मोठा गाजावाजा करून आणि राजकीय हेतूने करण्यात आली होती. योग्य नियोजनाचा, योग्य कार्यवाहीचा तसेच देखभालीचा अद्यापही अभाव असल्यामुळे प्रवाशांना या मार्गावर त्रास सहन करावा लागत आहे. नाकर्तेपणामुळे झालेली ही दिरंगाई झाकून आता नव्या मार्गावर बीआरटी सुरू करण्यासाठी घाट घातला जात आहे, अशी तक्रार या निवेदनातून करण्यात आली आहे.
खराडी व आळंदी मार्गावर बीआरटीची जी चाचणी घेण्यात आली, या चाचणीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. थांब्यांवर बीआरटीची गाडी सुरक्षितपणे थांबण्यासाठीची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, काही थांब्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे, बसथांब्यांवर स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आलेले नाहीत, काही थांब्यांवर फरशीचेही काम झालेले नाही. या आणि अशा अनेक बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.