16 January 2021

News Flash

कामगारांच्या विशेष प्रयत्नांमुळे गाडय़ा आल्या मार्गावर…

कामगारांनी एकाच वेळी पस्तीस जुनी इंजिन दुरुस्तीसाठी घेतली आणि प्रत्येकातील चांगले सुटे भाग घेऊन त्यातून सोळा इंजिन तयार केली. त्यामुळे बंद राहिलेल्या गाडय़ा मार्गावर धावू

| July 25, 2015 03:15 am

इंजिन दुरुस्तीचे मोठे काम निघाल्यामुळे गेली दोन वर्षे बंद असलेल्या पीएमपीच्या गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी कामगारांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे पहिल्या टप्प्यात सोळा मार्गावर गाडय़ा आणण्यात पीएमपीला यश आले आहे. कामगारांनी एकाच वेळी पस्तीस जुनी इंजिन दुरुस्तीसाठी घेतली आणि प्रत्येकातील चांगले सुटे भाग घेऊन त्यातून सोळा इंजिन तयार केली. त्यामुळे बंद राहिलेल्या गाडय़ा मार्गावर धावू लागल्या आहेत.
इंजिनाचे काम निघाल्यामुळे पीएमपीच्या तब्बल दीडशे गाडय़ा गेली दोन वर्षे बंद होत्या. या गाडय़ांच्या इंजिन दुरुस्तीचे काम खासगी कंपनीकडून करून घेतले असते तर प्रत्येक गाडीसाठी किमान चार लाख रुपये खर्च आला असता. मात्र पीएमपीच्या स्वारगेट मध्यवर्ती यंत्रशाळेतील कामगारांनी वरिष्ठ व्यवस्थापक निवृत्ती भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नादुरुस्त इंजिन दुरुस्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मध्यवर्ती यंत्रशाळेत एकाचवेळी सत्तेचाळीस बंद इंजिन आणण्यात आली होती. दुरुस्तीचे हे काम अवघड व मोठय़ा स्वरुपातील असल्यामुळे त्यासाठी जागाही मोठी लागणार होती. त्यासाठी यंत्रशाळेत गेली दहा वर्षे पडून राहिलेले भंगार काढून ़इंजिन दुरुस्तीसाठी जागा रिकामी करण्यात आली. त्यानंतर एकाचवेळी पस्तीस इंजिन उघडण्यात आली आणि दुरुस्ती कामासाठी प्रत्येक इंजिनमधील कोणते सुटे भाग चांगले आहेत ते तपासून ते वेगळे करण्यात आले. या चांगल्या भागांपासून पहिल्या टप्प्यात सोळा इंजिन तयार करण्यात आली आणि ती बंद गाडय़ांना बसवण्यात आली. उर्वरित इंजिन तयार करण्याचे काम यंत्रशाळेत सुरू आहे. या कामामुळे खर्चातही मोठी बचत झाली असून गाडय़ाही मार्गावर आल्या आहेत.
इंजिनचे काम पूर्ण झालेल्या गाडय़ांपैकी दहा गाडय़ा पहिल्या टप्प्यात मार्गस्थ झाल्या असून या गाडय़ा इंजिन दुरुस्तीसाठी दोन वर्षे बंद होत्या. यंत्रशाळेकडील दीडशे आणि आगारांमधील तीस अशा एकशेऐंशी गाडय़ा इंजिन दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून त्यातील पासष्ट गाडय़ा रक्षाबंधनापर्यंत मार्गस्थ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विविध प्रकारच्या दुरुस्ती कामासाठी चाळीस गाडय़ा गेली दोन वर्षे बंद होत्या. त्यातील नऊ गाडय़ांची दुरुस्ती पूर्ण करून त्याही मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. हे काम येत असलेले सहा चालक आणि चार सेवक असे दहाजण मिळून हे काम सध्या करत असल्याचे सांगण्यात आले. विविध कारणांमुळे पीएमपीच्या दोनशे एकोणीस गाडय़ा गेली एक ते चार वर्षे बंद आहेत. त्यातील पंचाऐंशी गाडय़ा पहिप्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्यात सत्तर आणि तिसऱ्या टप्प्यात चौसष्ट गाडय़ा मार्गावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती यंत्रशाळेतील कामगारांच्या या प्रयत्नांची पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी विशेष दखल घेतली असून त्यांनी या सर्व कामगारांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2015 3:15 am

Web Title: pmp engine workers repair
टॅग Pmp
Next Stories
1 विश्व साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये अचानक बदल
2 वीज ग्राहकांचे प्रश्न मांडणाऱ्या समितीची सहा वर्षांत एकच बैठक
3 अजितदादा घेणार उद्या नगरसेवकांचा ‘वर्ग’ !
Just Now!
X