पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दहा वातानुकूलित गाडय़ा दाखल होणार आहेत. ‘पुणे दर्शन’ या फेरीसाठी पाच आणि लोहगाव विमानतळ ते हिंजवडी या मार्गासाठी पाच अशा दहा गाडय़ांच्या खरेदीला पीएमपीच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यानुसार लवकरच पाच कोटी रुपये खर्च करून दहा गाडय़ांची खरेदी केली जाईल.
पीएमपीतर्फे चालवल्या जाणाऱ्या पुणे दर्शन फेरीसाठी सध्या वेगळ्या गाडय़ा वापरल्या जात नाहीत. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या गाडय़ांपैकी एक गाडी सध्या या फेरीसाठी पाठवली जाते. मात्र या फेरीला येणाऱ्या पर्यटक व प्रवाशांचा विचार करून पुणे दर्शन फेरीसाठी चांगल्या पद्धतीच्या तसेच आकर्षक रंगसंगती असलेल्या वातानुकूलित गाडय़ा उपलब्ध करून देण्याचा विषय गेली काही वर्षे चर्चेत होता. इतर गाडय़ांपेक्षा वेगळ्या आणि वातानुकूलित गाडय़ा या फेरीसाठी आता उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या बरोबरच विमानतळ ते हिंजवडी या मार्गावरही वातानुकूलित गाडय़ा देण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार पुणे दर्शन फेरीसाठी पाच आणि विमानतळ ते हिंजवडी मार्गासाठी पाच अशा दहा गाडय़ांच्या खरेदीला पीएमपीच्या संचालकांनी गुरुवारी मान्यता दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 29, 2015 3:06 am