शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांसाठी पीएमपीचा मोफत पास महापालिकेने द्यायचा, का विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करायची या बाबतचा निर्णय स्थायी समितीला गुरुवारी (१६ जुलै) घ्यावा लागणार आहे. पासच्या दराचा विचार करून विद्यार्थ्यांकडून पंचवीस टक्के शुल्क आकारावे असा निर्णय यंदा झाला असून त्याला मोठा विरोध झाला आहे.
महापालिकेकडून गेली आठ वर्षे शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीचा पास मोफत दिला जात होता. यंदा या पद्धतीत बदल करून मोफत पास फक्त महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना द्यावेत आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून पास रकमेच्या पंचवीस टक्के शुल्क आकारावे असा निर्णय झाला आहे. या निर्णयाला विरोध करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मोफत पास मिळाला पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावेत असा प्रस्तावही शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, तसेच अशोक हरणावळ, संजय भोसले, संगीता ठोसर, सोनम झेंडे, नीता मंजाळकर आणि कल्पना थोरवे यांनी स्थायी समितीला दिला आहे.
शिवसेनेच्या सदस्यांनी दिलेला हा प्रस्ताव स्थायी समितीच्या गुरुवारी (१६ जुलै) होत असलेल्या बैठकीपुढे आला असून हा प्रस्ताव मंजूर करायचा का फेटाळायचा याबाबत समितीला बैठकीत काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे. यापूर्वी झालेल्या निर्णयाप्रमाणे यंदा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पालिका व खासगी शाळांमधील मिळून छत्तीस हजार विद्यार्थ्यांनी पीएमपीचा पास घेतला होता.