News Flash

दुप्पट टीडीआर किंवा चार एफएसआय

वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएचा प्रस्ताव

वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएचा प्रस्ताव

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी दुप्पट हस्तांतर विकास हक्क (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स – टीडीआर) किंवा चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) देण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या ३३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी सद्य:स्थितीत केवळ दहा टक्के जागा पीएमआरडीएला संपादित करता आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीबाहेर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीएने १२८ कि.मी लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याचे नियोजन केले आहे. या महात्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘भारतमाला’ योजनेत त्याचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी पीएमआरडीएला निधी उपलब्ध होणार आहे. मात्र, प्रकल्पाचे ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय त्याचे काम सुरू करता येणार नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) धोरण आहे.

वर्तुळाकार रस्त्यालगत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून जागा ताब्यात घेण्याचे पीएमआरडीएचे नियोजन आहे. तर, उर्वरित जागा टीडीआर किंवा एफएसआयच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ज्या भागात नगररचना योजना करणे शक्य नाही, तेथे टीडीआर किंवा एफएसआयचा पर्याय देण्यात आला आहे. परिणामी, जमीन ताब्यात येणे सुलभ होणार आहे. याशिवाय पीएमआरडीएचा वर्तुळाकार रस्त्याचा केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आल्याने टीडीआर वापरण्यासाठी ०.२ ही मर्यादा वगळण्यात आली आह.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या ३३ किलोमीटरपैकी दहा टक्के जागा ताब्यात आली असून या जमिनी खासगी व्यावसायिकांच्या असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम आंबेगाव खुर्दपासून सुरू होणार असून गुजर निंबाळकरवाडी, हांडेवाडी, वडकी, उरूळी देवाची, मांजरी खुर्द ते वाघोलीपर्यंत प्रस्तावित आहे.

वर्तुळाकार रस्त्याची वैशिष्टय़े

पीएमआरडीएचा वर्तुळाकार रस्ता आठ पदरी आहे. रस्त्याची नियोजित रुंदी ११० मीटर असून लांबी १२८ किलोमीटर आहे. संपूर्ण रस्त्याच्या दरम्यान छोटेमोठे २५ पूल बांधावे लागणार आहेत, तर सहा मोठे उड्डाणपूलही प्रस्तावित आहेत. या रस्त्यात काही ठिकाणी रेल्वेमार्गही येत असून त्याठिकाणी तीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. याशिवाय रस्त्याच्या बाजूने सेवा रस्तेही होणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण २३ हजार ८२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून एनएचएआयकडून दहा हजार २३४ कोटी रुपये मिळणार आहेत. भूसंपादन आणि सेवा रस्ते करण्यासाठी पीएमआरडीएला १३ हजार ५९४ कोटी रुपये खर्च येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:25 am

Web Title: pmrda proposes double tdr on land acquisition for ring road zws 70
Next Stories
1 मागणीअभावी लिंबाच्या दरात मोठी घट
2 गुरुजींच्या ‘यमन’चे सूर प्रत्येक वेळी वेगळेच
3 तिसऱ्या मजल्यावरून तरुणीला फेकले, तरुणीचा जागीच मृत्यू
Just Now!
X