कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना साहित्यदीप पुरस्कार प्रदान
संवेदनशील मनाने सर्जनाचा शोध घेण्यासाठीच लेखक आणि कलावंत धडपडत असतात, अशी भावना प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. हा शोध घेण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते, असेही त्या म्हणाल्या.
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्या हस्ते अरुणा ढेरे यांना साहित्यदीप पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर या वेळी उपस्थित होते.
मातृभाषा ही आपलीच भाषा असे सवयीने प्रत्येकाला वाटते. त्यामुळे भाषेवर हुकुमत आहे अशा भ्रमात असतो खरे. पण, ती भाषा आपल्याला खरी समजली आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ढेरे म्हणाल्या, आपल्या शक्ती विस्तारत भाषेच्या निर्गुण मूर्तीला सजविण्यात धन्यता मानतो. पण, निर्गुण ब्रह्म हे त्यापलीकडे असते. ते हाती गवसतेच असे नाही. कलावंतापेक्षा माणूस मोठा आणि कलेपेक्षा जीवन मोठे असते. पण, खरेच आपण माणूस म्हणून जगतोय का? व्यक्तिजीवनाचा परीघ आपण संकुचित केला आहे. आपण गर्दीत असलो तरी समूहात नसतो. चाकोरीमध्येच अडखळत पावले टाकत असतो. जागतिकीकरणामध्ये आपण विवेक आणि संयम पाळतो का याचा शोध घेणे ही सर्जनशीलतेची प्रवृत्ती आहे. हा शोध घेण्यासाठीच लेखक आणि कलावंताची धडपड सुरू असते.
वाचकांनाही प्रश्न पडावेत असे विषय लेखकाने आपल्या साहित्यकृतीतून मांडले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केली. व्रतस्थ ज्ञानसाधकांच्या परंपरेत इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांच्यानंतर संशोधन आणि साहित्याचा दीप तेवत ठेवणाऱ्या अरुणा ढेरे यांचे नाव घ्यावे लागेल, असे मििलद जोशी यांनी सांगितले. संशोधन आणि काव्यामागचा जीवनरस एकच असल्याने ढेरे यांच्या साहित्य निर्मितीचे वेगळे कप्पे करता येणार नाहीत, असे नीलिमा गुंडी यांनी सांगितले.
ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात ‘कळ्या आणि पाणी’ या कार्यक्रमात गौरी लागू, ज्योती सुभाष, अनुराधा मराठे आणि डॉ. आशुतोष जावडेकर यांनी डॉ. अरुणा ढेरे यांच्या साहित्याचे अभिवाचन केले.