21 October 2019

News Flash

पिंपरी-चिंचवड : पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांना बेदम मारहाण

वाकड पोलीस ठाण्याच्या अवघ्या 20 मीटर अंतरावर दोन गटात धारदार शस्त्रासह भांडण सुरू होते...

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या अवघ्या 20 मीटर अंतरावर दोन गटात धारदार शस्त्रासह भांडण सुरू होते, तेव्हा वाकड पोलिसांनी धाव घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत काठीने मारहाण करत पोलिसांनाच जखमी केले आहे. या घटनेत पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा उजवा पाय जायबंदी झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साजन सुभाष सुकळे,सुभाष रामा सुकळे,लहू बापू सुकळे,अनिल अण्णा सुकळे,शिवाजी बापू सुकळे यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

(जखमी, पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर )

सविस्तर माहिती अशी की, वाकड पोलीस ठाण्याच्या समोर अवघ्या वीस मीटर अंतरावर दोन गटात कोयता आणि काठी घेऊन भांडण सुरू होते. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यासमोर होत असल्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी पोलीस नाईक व्ही.एस कुदळ,जखमी प्रमोद भांडवलकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, भांडण सोडवण्यासाठी गेले असता यातील काही आरोपींनी भांडलवकर यांना कोयत्याचा धाक दाखवत एकाने उजव्या पायावर काठीने जोरात मारले. यात भांडवलकर हे गंभीर जखमी झाले असून इतर पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली. याप्रकरणी उशिरा वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक व्ही.एस. कुदळ यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटनेत वाढ झाली आहे.

First Published on January 10, 2019 9:41 pm

Web Title: police beaten by mob in front of wakad police station pimpri chinchwad