लोणावळ्यातील धबधब्याखाली असलेल्या भोवऱ्यात बुडून श्रीराम साहू या पर्यटकाचा मृत्यू झाला. हा मृतदेह काढताना एका पोलिसाचा जीव थोडक्यात बचावला आहे. साहूचा मृतदेह काढणे फारच कठीण होते. मृतदेह काढत असताना एका पोलीस मित्राचा पाय घसरला आणि थेट तो त्याच भोवऱ्यात गेला. मात्र तेथील उपस्थितांनी तातडीने त्यांना बचावले आणि सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, गेल्या आठवड्यातच भुशी धरणावर पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून काही तरुणांचा जीव वाचवला होता ही घटना ताजी असताना पोलिसांना अशाप्रकारे मृतदेह बाहेर काढताना जीव धोक्यात घालावा लागतो आहे.

श्रीराम साहू (वय-२४) हा पर्यटक मंगळवारी तीन मित्रांसह लोणावळ्यात फिरण्यासाठी आला होता. भुशी धरणाकडे जाण्याआधी त्याने मद्यपान केले त्यानंतर भुशी धरणावर गेला आणि तिथे काही तास पाण्यात बसून सर्वांनी मस्ती केली. मित्रांनी घुबड तलावाकडे जाण्याचे ठरवले. त्यानुसार रिक्षा करून सर्व जण तिकडे गेले. जवळच असलेल्या धबधब्या खाली साहू गेला मात्र त्याने मद्यपान केले असल्याने तिथे भोवरा असल्याचे लक्षात आले नाही. त्याचा त्यात बुडून मृत्यू झाला होता. मृतदेह काढण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

मात्र धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह आणि वेग हा प्रचंड होता त्यामुळे सहजासहजी त्याचा मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. पोलीस कर्मचारी आणि पोलीस मित्र यांनी मानवी साखळी करून मृतदेह काढण्याची जीवघेणी कसरत केली. तेव्हा पाण्याच्या प्रचंड वेगाने पोलीस मित्राचा पाय घसरला आणि तो त्याच भोवऱ्यात गेला. त्याला उपस्थितांनी वेळीच बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला त्यांचा जीव वाचला. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या पैकी एकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र लोणावळा शहर पोलीस आणि मित्रांना जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवावे लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी देखील अश्या ठिकाणी जाऊन नये असे आवाहनही करण्यात येते आहे.