पसार झालेल्या हल्लेखोरांच्या मागावर पोलिसांची पथके

प्रभात रस्ता भागात बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात शहा यांचा खून आर्थिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

रवी चोरगे आणि राहुल शिवतरे (दोघे रा. नवी पेठ)अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून त्यांना पकडण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी पाच पथके गुन्हे शाखेची आहेत. तांत्रिक तपास, खबऱ्यांकडून माहिती मिळवण्यात येत आहे. शहा यांच्या खूनप्रकरणात काही सराईतांकडे चौकशी सुरू असल्याचे समजते. देवेन शहा (वय ५५) हे कुटुंबीयांसोबत प्रभात रस्ता भागातील सायली अपार्टमेंटमध्ये राहायला होते. देवेन शहा कुटुंबीयांसोबत शनिवारी रात्री बाणेर भागातील हॉटेलमध्ये गेले होते. तेथून रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरी परतले. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास दोन आरोपी शहा यांच्या सोसायटीत आले. शहा यांच्याबाबत रखवालादाराकडे चौकशी केली. शहा आणि त्यांचा मुलगा अतित सोसायटीत तळमजल्यावर आले. तेव्हा दोघा आरोपींनी शहा यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शहा यांचा रात्री बाराच्या सुमारास खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

सायली अपार्टमेंटच्या तळमजल्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणात गोळीबार करणारे आरोपी आढळून आले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपी चोरगे, शिवतरे यांची नावे निष्पन्न झाली. डेक्कन पोलिसांचे तपास पथक तसेच गुन्हे शाखेची पाच पथके आरोपींचा माग काढत आहेत. आरोपी चोरगे, शिवतरे जमीन खरेदी-विक्री व्यवहार करायचे. शहा यांनी कोंढवा, पौड, धायरी भागातील काही जमिनीचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी काही जमिनींची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. आरोपी आणि शहा यांचे जमीन विक्रीच्या व्यवहारातून वाद झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, आरोपी शहरातून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने पोलिसांची पथके बाहेरगावी जाऊन तपास करत आहेत.